

उल्हासनगर: मतदार यादीच्या विशेष सघन पुनरीक्षणाच्या (SIR) कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत उल्हासनगर महानगरपालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांविरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुंदर लांडगे आणि दिनेश मरोठिया अशी गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे असून, दोघांचीही बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
उल्हासनगर महापालिकेचे सहायक आयुक्त विशाल वसंत कदम यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मतदार यादीच्या विशेष सघन पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत दोन्ही कर्मचाऱ्यांवर मतदारांकडून ईएफ (EF) फॉर्मचे वाटप करून त्याचे डिजिटायझेशन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे आणि एसडीओ विजयआनंद शर्मा यांच्या उपस्थितीत 4 ऑगस्ट रोजी एसआयआरच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीत दोन्ही BLO ची कामगिरी अपेक्षेप्रमाणे नसल्याचे निदर्शनास आले.
सुंदर लांडगे यांनी आतापर्यंत केवळ ८३.१७ टक्के ईएफ फॉर्मचे वाटप पूर्ण केले असून, त्यापैकी २२.६७ टक्के कामाचे डिजिटायझेशन झाले आहे. तर दिनेश मरोठिया यांनी ९४.०४ टक्के फॉर्मचे वाटप पूर्ण केले असून, केवळ २८.४८ टक्के कामाचे डिजिटायझेशन केले आहे.
दोन्ही कर्मचाऱ्यांना एसआयआरचे काम १०० टक्के पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून वारंवार तोंडी आणि लेखी सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच व्हॉट्सॲप संदेशाद्वारेही काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. याशिवाय संबंधित कर्मचाऱ्यांना २८ जुलै रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.
मात्र, वारंवार सूचना देऊनही दोन्ही कर्मचाऱ्यांच्या कामात अपेक्षित सुधारणा झाली नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आढावा बैठकीत देण्यात आलेल्या सूचनांनंतरही त्यांनी कामाची गती वाढविली नसल्याचा आरोप आहे.
दरम्यान, एसआयआरचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून BLO च्या कामावर बारकाईने लक्ष ठेवले जात असतानाच दोन कर्मचाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल झाल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम ३२ अंतर्गत मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.