

सुवर्णा दिवेकर
अलिबाग: राज्यात सध्या सुरू असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे.
रायगडमध्ये मतदार गणना पत्रकांचे ९६ टक्के डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे.प्रत्येक पात्र मतदाराची माहिती अद्ययावत करून पारदर्शक व विश्वासार्ह मतदार यादी तयार करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार, रायगड जिल्ह्यातील सुमारे २५.३३ लाख मतदारांपैकी २४.३० लाखांहून अधिक गणना पत्रकांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाने १०० टक्के डिजिटायझेशन पूर्ण केले असून, अलिबाग, पेण, महाड, उरण, कर्जत आणि पनवेल मतदारसंघांमध्येही काम अंतिम टप्प्यात आले आहे.
दरम्यान, या विशेष मोहिमेला १७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या मतदारांनी अद्याप गणना पत्रक भरलेले नाही, आवश्यक कागदपत्रे सादर केलेली नाहीत किंवा त्यांची माहिती ऑनलाइन नोंदविली गेलेली नाही, अशा नागरिकांना १७ ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी उपलब्ध आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना बूथस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. गणना पत्रक अचूकपणे भरून आवश्यक कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून दिल्यास मतदार यादीतील त्रुटी टाळता येतील आणि भविष्यात मतदानाचा हक्क बजावताना कोणतीही अडचण येणार नाही.
त्यामुळे अद्याप प्रक्रिया पूर्ण न केलेल्या मतदारांनी १७ ऑगस्टपूर्वी आपल्या बीएलओशी संपर्क साधून किंवा संबंधित निवडणूक यंत्रणेशी समन्वय साधून नोंदणी व डिजिटायझेशनची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.
श्रीवर्धनची अव्वल कामगिरी
मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाने शंभर टक्के कामकाज पूर्ण करत रायगड जिल्ह्यातील पहिला विधानसभा मतदारसंघ होण्याचा मान मिळविला आहे.
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, तळा आणि रोहा या तालुक्यांतील एकूण ३५१ मतदान केंद्रांचा समावेश आहे. मतदारसंघात एकूण २ लाख ६२ हजार ६८० मतदार असून त्यामध्ये १ लाख ३४ हजार १५८ महिला आणि १ लाख २८ हजार ५२२ पुरुष मतदारांचा समावेश आहे.प्रशासनाच्या जलद प्रक्रियेला नागरिकांसह राजकीय पक्षांची साथ लाभल्याचे दिसून आले.
रायगड जिल्ह्यात गणना पत्रकांचे सुमारे ९६ टक्के डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील सर्व सात विधानसभा मतदारसंघांमध्ये बूथस्तरीय अधिकारी घराघरांत जाऊन मतदारांना गणना पत्रकांचे वाटप करत असून, भरून आलेल्या पत्रकांची माहिती मोबाईल ॲपद्वारे ऑनलाइन प्रणालीमध्ये नोंदविण्याचे काम वेगाने सुरू आहे.
- किशन जावळे, जिल्हाधिकारी