

उल्हासनगर : गणपती बाप्पाच्या आगमनाच्या अवघ्या एक दिवस आधी उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाले. दोन तरुणांनी केलेल्या बेदम मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या एका युवकाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
विकास पगारे आणि विक्रम बावगे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ८:३० वाजता व्हीनस चौकातील 'मास्टर वाइन शॉप'मध्ये दारू खरेदी करताना धक्का लागण्याच्या किरकोळ कारणावरून नितेश डोघे याचा विकास आणि विक्रम या दोघांशी वाद झाला होता.
यानंतर दोन्ही आरोपींनी नितेशचा पाठलाग करत जंगल हॉटेलजवळील सार्वजनिक रस्त्यावर त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत नितेश गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मृताच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे काही तासांतच दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.
दोन्ही आरोपींविरोधात हत्येच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास विठ्ठलवाडी पोलीस करत आहेत.