

ठाणे : सामान्य प्रवाशांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस ताफ्याला आता आधुनिकतेची नवी झळाळी मिळणार आहे. त्याच दिशेने ५ हजार ‘लालपरी’ बसेसच्या खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
या निविदा प्रक्रियेत सर्वांत कमी दराचा देकार टाटा मोटर्सने सादर केला आहे. त्यामुळे बसेसच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
मंत्री सरनाईक म्हणाले की, नव्या ५,००० ‘लालपरी’ बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर ग्रामीण महाराष्ट्राची ‘लोकवाहिनी’ असलेल्या एसटीला मोठी बळकटी मिळणार आहे. नव्या बसेसमुळे जुन्या बसेसवरील ताण कमी होईल, बसफेऱ्यांची उपलब्धता वाढविणे शक्य होईल आणि प्रवाशांना अधिक चांगली सेवा देता येईल. जुन्या व गळक्या बसेस तसेच प्रवासादरम्यान बसेस बंद पडण्याच्या समस्येवरही नव्या ताफ्यामुळे प्रभावीपणे मात करता येणार आहे.
पुढील सहा महिन्यांत सुमारे ५,००० हून अधिक बसेस प्रवासी सेवेतून कालबाह्य होऊन भंगारात जाणार आहेत. सध्या महामंडळाला नाईलाजास्तव १२ ते १४ वर्षे जुन्या झालेल्या बसेसची दुरुस्ती करून त्यांचा प्रवासी सेवेसाठी वापर करावा लागत आहे. या बसेस सातत्याने रस्त्यात नादुरुस्त होत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. चालकांनाही अशा जुन्या बसेस चालविताना मोठी कसरत करावी लागते. या सर्व समस्यांना लवकरच पूर्णविराम मिळणार आहे.
एसटी महामंडळाने यापूर्वीच बसताफ्याच्या आधुनिकीकरणाला सुरुवात केली आहे. २ बाय २ आसन व्यवस्थेच्या २,६४० ‘लालपरी’ बसेस ताफ्यात दाखल झाल्या आहेत. त्याचबरोबर ३ बाय २ आसन व्यवस्थेच्या ३,००० ‘राजमाता जिजाऊ’ बसेस ताफ्यात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नव्या बसेसच्या समावेशामुळे एसटीचा ताफा अधिक तरुण, सक्षम आणि प्रवाशांच्या गरजांशी सुसंगत होत आहे.
मागेल त्याला बस
सध्या एसटीकडे बसेसची कमतरता असल्याने अनेक शालेय फेऱ्या अचानक रद्द करणे, ग्रामीण भागातील मुक्कामी बसेस उपलब्ध न होणे, अशा कटू प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. नव्या ५,००० बसेस ताफ्यात दाखल झाल्यानंतर ‘मागेल त्याला बसफेरी’ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
बसफेरीचा फायदा झाला नाही तरी चालेल; मात्र बसफेरीची मागणी करणाऱ्यांनी ती फेरी तोट्यात चालणार नाही, याची हमी घ्यावी, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
विशेष म्हणजे, ५,००० ‘लालपरी’ बसेसचा हा टप्पा एसटीच्या पारंपरिक डिझेल बसच्या युगातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. यानंतर पर्यावरणपूरक ई-बसेसच्या दिशेने एसटी महामंडळाचा प्रवास अधिक वेगाने सुरू होणार आहे, असे प्रतिपादन परिवहन सरनाईक यांनी केले.