

ठाणे; पुढारी वृत्तसेवा: ठाण्यात पाकिस्तान सुपर लीग सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. कारवाई गुन्हे प्रकटीकरण कक्ष १ च्या पथकाने घोडबंदर येथील बुटीक हॉटेलमध्ये केली. दोन्ही आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर केले असता १८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सांगितले.
पाकिस्तानमध्ये सध्या पाकिस्तान सुपर लीगगचे ट्वेंटी-ट्वेंटी सामने सुरू आहेत. या स्पर्धेत सहभागी झालेल्या लाहोर क्वॉलंडर्स व क्वोटा ग्लॅडीयेटर्स या संघांच्या सामन्यावर ठाण्यातील बुटीक हॉटेलमधून सट्टा घेत असल्याची गुप्त माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष १ च्या पथकाला मिळाली.
पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि निलेश मोरे, हवालदार भरत आरवंदेकर,आशीष ठाकूर, उमेश जाधव, हरिष तावडे, पोलीस नाईक अमोल देसाई यांनी हॉटेलमध्ये छापा टाकला. ( पाकिस्तान सुपर लीग सामन्यांवर सट्टा )
या दरम्यान रुम नं. ४०४ मध्ये दीपक ठक्कर ( वय ५६) व जितेंद्र चंदे ( वय ४८) हे मोबाईलवरून सट्टा लावताना आढळून आले. या कारवाईत ४ मोबाईल, कॅलेक्युलेटर, डायरी जप्त करण्यात आली. या प्रकरणी चितळसर मानपाडा पोलीस ठाण्याात गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.
हेही वाचलंत का?