

ठाणे : टीडब्ल्यूजे कंपनीने राज्यभरातील तब्बल 11 हजार गुंतवणूकदारांची सुमारे 1 हजार 200 कोटींची फसवणूक केली असल्याची माहिती ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासातून समोर आली आहे. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांमध्ये राज्यातील अनेक राजकीय नेते, अधिकारी, उद्योजक अशा व्हीआयपींचा समावेश आहे. दरम्यान, या प्रकरणात फरार असलेला कंपनीचा मालक आणि व्यवस्थापकीय संचालक समीर सुभाष नार्वेकर आणि त्याची पत्नी नेहा नार्वेकर आणि अमीत विश्वनाथ बालम या तिघांना ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुजरात मधून शुक्रवारी अटक केली आहे. या तिघांना ठाणे न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ट्रेड विथ जॅझ (टीडब्ल्यूजे) असोसिएट्स प्रायव्हेट लिमिटेडने, टीडब्ल्यूजे इन्फ्रास्ट्रक्चर, टीडब्ल्यूजे बिजनेस कन्सलटिंग, टीडब्ल्यूजे इव्हेंट, टीडब्ल्यूजे आयटी सोल्युशन, टीडब्ल्यूजे मीडिया अशा पंधराहून अधिक कंपन्या बनवून या कंपनीने गुंतवणुकीवर उच्च परतावा देण्याचे आमिष दाखवून तसेच सरकारी प्रकल्पांसाठी मोठे कंत्राट मिळवण्याचा दावा करून राज्यभरातील अनेक व्हीआयपी लोकांना आपल्या जाळ्यात ओढले होते. कंपनीच्या अनेक प्रकल्पात गुंतवणुकीच्या नावाखाली करोडो रुपयांची माया जमवून कंपनीने गाशा गुंडाळला होता.
त्यानंतर कोकणासह राज्यभरातून कंपनी विरोधात पोलिसांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर कंपनीचा मालक आणि व्यवस्थापकीय संचालक समीर नार्वेकर, त्याची पत्नी नेहा नार्वेकर यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर ठाणे, चिपळून, पुणे, यवतमाळसह विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर गुन्हा दाखल झाल्यापासून नार्वेकर दाम्पत्य व त्यांचे साथीदार फरार झाले होते. या गुन्ह्याचा तपास ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता. दरम्यान, ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणातील आरोपी समीर नार्वेकर, त्याची पत्नी नेहा नार्वेकर, कंपनीचा संचालक अमीत बालम या तिघांना शुक्रवारी गुजरात राज्यातून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांना ठाणे न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, गुन्ह्याच्या तपासातून व अटक आरोपींच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. नार्वेकर दाम्पत्य व त्यांच्या साथीदारांनी टीडब्ल्यूजे असोसिएट्स प्रायव्हेट लिमिटेडसह पंधराहून अधिक कंपन्या स्थापन करून राज्यभरातील तब्बल 11 हजार गुंतवणूकदारांना 1 हजार 200 कोटी रुपयांचा गंडा घातला असल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे अनेक शासकीय कामांचे मोठे कंत्राट मिळणार आहे अशी बतावणी करून या कंपनीने राज्यभरातील राजकीय नेते, बडे अधिकारी व उद्योजक यांना देखील आपल्या जाळ्यात ओढले होते.
जास्त परताव्याच्या आमिषापोटी अनेक व्हीआयपी लोकांनी कंपनीत शेकडो कोटींची गुंतवणूक केली होती. मात्र, कंपनीचे मालक असलेले नार्वेकर दाम्पत्य व त्यांचे साथीदार गडगंज माया जमवून फरार झाले. त्यानंतर कंपनी विरोधात राज्यभरातील एकूण सोळा जिल्ह्यात विविध ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा सारा फसवणुकीचा बाजार फेब्रुवारी 2024 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत सुरू होता. दरम्यान, आरोपींच्या चौकशीतून अजूनही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.