टिटवाळा: टिटवाळा परिसरातील उड्डाणपूल पुन्हा एकदा भीषण अपघाताने हादरला असून, वाढत्या दुर्घटनांच्या मालिकेमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नव्या पाण्याच्या टाकीजवळ, कल्याणकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर दुचाकीस्वाराचा भीषण अपघात घडला.
या अपघातात आकाश चौघे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची तीव्रता इतकी होती की काही काळ संपूर्ण परिसरात गोंधळ आणि भीतीचे सावट पसरले होते. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमी अवस्थेतील आकाश चौघे याला सावरकर नगर येथील आशीर्वाद रुग्णालयात दाखल केले.
त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. रुग्णालय प्रशासनाने त्याच्या नातेवाईकांनी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहनही केले आहे.
दरम्यान, या घटनेने टिटवाळा उड्डाणपुलावरील वाढत्या अपघातांचा गंभीर मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही महिन्यांत या मार्गावर सातत्याने अपघात होत असून, बेफाम वेग, वेगमर्यादेचा पूर्ण अभाव, तसेच वाहतूक नियंत्रणातील ढिसाळपणा यामुळे हा पूल अपघातांचा हॉटस्पॉट बनला आहे.
विशेष म्हणजे या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कमतरता असल्याने अपघातांची नेमकी कारणे समोर येत नाहीत आणि दोषींवर कारवाई करणे कठीण ठरत आहे. याहूनही गंभीर बाब म्हणजे रात्रीच्या वेळेस या उड्डाणपुलावर विशेषतः रिजेन्सी सर्वंमकडे जाणारा उड्डाणपूल या ठिकाणी सतत मद्यधुंद तरुणांकडून बाईक रेसिंगचा धिंगाणा घालण्यात येत असल्याचे वारंवार समोर येत आहे.
सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेकजण जीव धोक्यात घालून थरारक बाईक स्टंट रील करताना दिसतात. त्यामुळे हा पूल केवळ वाहतुकीचा मार्ग न राहता, जीवघेण्या स्टंटसाठीचे मैदान बनत चालल्याची धक्कादायक वस्तुस्थिती उघड झाली आहे.
ग्रामीण भागासाठी स्वतंत्र वाहतूक शाखेची मागणी
या पार्श्वभूमीवर स्वतंत्र वाहतूक शाखेची मागणी पुन्हा एकदा तीव्र झाली आहे. संपूर्ण ठाणे जिल्हा ग्रामीण भागासाठी स्वतंत्र वाहतूक शाखा स्थापन करण्याची मागणी ॲड. जितेंद्र जोशी सातत्याने करत आहेत. प्रशासनाकडून याबाबत सकारात्मक संकेत देण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.
परिणामी, वाढत्या अपघातांच्या घटनांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिक, प्रवासी आणि सामाजिक कार्यकर्ते आता आक्रमक भूमिका घेत असून, तातडीने कठोर उपाययोजना राबवण्याची एकमुखी मागणी करत आहेत.
नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे
उड्डाणपुलावर कडक वेगमर्यादा लागू करणे, सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, नियमित गस्त घालणारी स्वतंत्र वाहतूक यंत्रणा उभी करणे आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. अन्यथा, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अशा दुर्घटना पुन्हा घडत राहतील आणि निष्पाप नागरिकांना त्याची किंमत जीव देऊन चुकवावी लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.