Titwala Crime News: कामाचे पैसे मागितल्याच्या रागातून परप्रांतीयांकडून आई, मुलावर हल्ला; टिटवाळ्यातील घटना

युवकाच्या डोळ्याला गंभीर दुखापत, 2 मे 2026 रोजी सायंकाळी ही घटना घडली.
Titwala Crime News
Titwala Crime NewsPudhari
Published on
Updated on

टिटवाळा: टिटवाळा येथील मोरया नगर परिसरात कामाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून मराठी युवक व त्याच्या आईवर परप्रांतीयांकडून झालेल्या निर्घृण हल्ल्याने परिसर हादरला आहे. या घटनेत योगेश शिंदे याच्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून, नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 2 मे 2026 रोजी सायंकाळी ही घटना घडली.

गटार पाईपलाईन दुरुस्तीचे काम पूर्ण करूनही मोबदला देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने मेस्त्री काम करणारे योगेश शिंदे हे पैसे मागण्यासाठी मनीष बाथम यांच्या चाळीत गेले होते.

Titwala Crime News
Gokhivare Waste Scam: गोखिवरे कचरा घोटाळ्याचा महासभेत स्फोट! संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे महापौरांचे आदेश

यावेळी किरकोळ वादातून परिस्थिती चिघळली आणि मनीष बाथम, हर्ष बाथम व सुनिल बाथम यांनी संतापाच्या भरात शिवीगाळ, दमदाटी करत शिंदे यांच्यावर हल्ला चढवला. बाजूला पडलेला बांबू उचलून त्यांच्या डाव्या डोळ्यावर प्रहार करण्यात आला.

या हल्ल्यातून मुलाला वाचवण्यासाठी धावलेल्या शिंदे यांच्या आईलाही आरोपींनी मारहाण करत शिवीगाळ व धमकी दिल्ली. जखमी अवस्थेत दोघांनी मदतीसाठी आर्त हाक दिल्यानंतर स्थानिकांनी धाव घेतली. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी पोहोचून एका आरोपीला पकडत पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती समोर आली आहे.

Titwala Crime News
Tansa Wildlife Sanctuary:तानसा अभयारण्यात विविध प्राणी पक्षी, सरपटणाऱ्या प्राण्यांची नोंद

या घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार सेनेचे उपाध्यक्ष ॲड. अविनाश पांडुरंग शिळकंदे यांनी प्रशासनावर तीव्र शब्दांत टीका करत राज्यातील वाढत्या परप्रांतीयांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला.

अनेकजण बेकायदेशीररीत्या वास्तव्यास राहून अशा घटनांना खतपाणी घालत असल्याचे त्यांनी म्हटले. विशेष कार्यकारी अधिकारी दिलीप पुनमचंद राठोड यांनीही या घटनेचा निषेध नोंदवत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई करून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

पोलिसांनी आरोपींविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे टिटवाळा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.

logo
Pudhari News
pudhari.news