

The steps of tourists are turning towards the green Malanggad area
नेवाळी : पुढारी वृत्तसेवा
पावसाळा सुरू झाला की पर्यटकांची पावले आपसुकच निसर्गाच्या सान्निध्यात रमण्यासाठी वळू लागली आहेत. ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगड भागाला दरवर्षी पावसाळ्यात भेट देणार्या पर्यटकांची संख्या लक्षणीय असते. परंतु अतिउत्साही पर्यटक पाण्याचा अंदाज नसताना देखील मृत्यूच्या सापळ्यात उड्या घेऊन आपले जीव गमावत असतात.
यंदा देखील पर्यटकांच्या या जीवघेण्या उड्या सरू झाल्या असून पोलीस यंत्रणेची डोकेदुखी वाढली असून खरड, कुशिवली, मलंगगड, चिंचवली आदी स्थळे ही धोकादायक असूनही पर्यटकांची पावले बिनधास्तपणे या स्थळांकडे वळू लागली आहेत.
अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगड भागात पावसाळ्यात पर्यटकांची ये जा मोठ्या प्रमाणात सुरू असते. यंदा देखील पर्यटक मोठ्या प्रमाणात मलंगगड भागाकडे वळण्यास सुरू झाले आहे. मात्र या परिसरातील नदीला सातत्याने पूर येत असतो. तर नदी पात्रात अनेक ठिकाणी विहिरी असल्याने नदीत उड्या घेणार्यांना त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे नदीपात्रात पोहण्यासाठी उतरून मलंगगड भागात जीव गमावणार्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे यंदा नदी पात्रात पर्यटकांना उतरण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वेळीच अटकाव करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.