

Ashwini Bidre Death Certificate
मिरा रोड : मिरा रोडपोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे - गोरे यांचा मृत्यू होऊ न नऊ वर्षे झाली आहेत. त्यांची हत्या झाल्याचे न्यायालयात स्पष्ट झाले आहे. मात्र त्यांच्या वारसांना लाभ मिळण्यासाठी मृत्यूचा दाखला देण्यात न आल्याने त्यांच्या मुलीला बर्याच अडचणी निर्माण होत आहेत.
बिद्रे कुटुंबियांनी मृत्यूचा दाखला मिळण्यासाठी पनवेल महापालिकेकडे मागणी केली असता आम्हाला मृत्यू दाखला देता येत नसल्याचे म्हटले आहे. त्यानंतर बिद्रे कुटुंबियानी मिरा भाईंदर महापालिकेकडे अर्ज केला असता मृत्यू होऊ न जास्त वर्षे झाल्यामुळे मृत्यू दाखला देण्याचे अधिकार तहसीलदार यांना आहेत, असे सांगितले. मृत्यूचा दाखला मिळण्यासाठी भाईंदरच्या अप्पर तहसिलदारांकडे अर्ज केला आहे. तहसिलदारांनी कायदेविषयक बाबी तपासून याचा निर्णय घेतला जाईल असे सांगितले आहे. त्यामुळे अश्विनी बिद्रे यांचा मृत्यू दाखला मिळण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांची फरफट सुरू आहे.
अश्विनी बिद्रे मृत्यू प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर व इतर तीन आरोपींना अटक करून त्यांच्या विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. या केसचा 21 एप्रिल रोजी जिल्हा व अति. सत्र न्यायाधीश, पनवेल न्यायालयात निकाल लागला. आरोपी अभय कुरुंदकर याला जन्मठेप व दंड तसेच इतर 2 आरोपींना 7 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. या खटल्याचे निकालपत्र न्यायालयाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेले आहे, मात्र हद्दीच्या वादामुळे दोन विभागांनी परस्परांकडे बोट दाखवल्याने अश्विनी बिद्रे यांचा मृत्यू दाखला तयारच झालेला नाही.
अश्विनी बिद्रेे यांची हत्या होऊ न नऊ वर्षे झाली. न्यायालयाने निकाल देऊनही दीड महिना झाला आहे तरीही त्यांचा मृत्यू दाखला मिळण्यासाठी कुटुंबीयांची फरफट सुरू आहे. ही अत्यंत खेदजनक बाब असल्याचे राजू गोरे यांनी सांगितले आहे.