अभ्यासावरून आई ओरडल्याने रागाच्या भरात मुलाने गाठले ठाकुर्ली रेल्वे स्थानक

अभ्यासावरून आई ओरडल्याने रागाच्या भरात मुलाने गाठले ठाकुर्ली रेल्वे स्थानक
Published on
Updated on

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा; अभ्यासावरुन आई ओरडली म्हणून राग आलेल्या ठाकुर्लीतील एका १२ वर्षीय मुलाने रस्ते, गल्ल्यांची माहिती नसताना ९० फुटी रस्त्याने प्रवास करत थेट ठाकुर्ली रेल्वे स्थानक गाठले. मुलगा खासगी शिकवणी वर्गात गेला नाही. घरीही वेळेत आला नाही म्हणून धास्तावलेल्या पालकांनी टिळकनगर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तात्काळ तपासचक्रांना वेग देऊन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून मुलाला ठाकुर्ली रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले. ही घटना गुरुवारी (दि.२३) घडली.

ठाकुर्लीच्या ९० फुटी रस्त्यावरील मध्यवर्गीय सोसायटीत राहणारा १२ वर्षाचा मुलगा गुरुवारी सकाळी अभ्यासावरुन आई रागावली म्हणून घरात रुसून बसला होता. खासगी शिकवणीची वेळ आली तेव्हा मुलाने आपले दप्तर काखोटीला मारुन रागाच्या भरात सकाळी १० वाजता घरातून बाहेर पडला. मुलगा शिकवणीला गेलाच नाही. नेहमीप्रमाणे शिकवणी संपली की मुलगा घरी येईल या भ्रमात आई राहिली. मुलाची नेहमीची घरी यायची, शाळेत जायची वेळ झाली तरी तो येत नाही म्हणून आईने शिकवणी वर्गाशी संपर्क साधला.

यावेळी मुलगा शिकवणीला आला नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मात्र घाबरलेल्या आईने मुलाच्या मित्रांशी संपर्क साधला. मुलगा कुठे दिसला का? कुठे गेला म्हणून चौकशी सुरू केली. परंतु कुणीही काही सांगू शकले नाही. अभ्यासावरून आपण मुलाला सकाळी ओरडलो, त्यामुळे तो रागाच्या भरात काही करतो की काय? या विचाराने आई व्याकुळ झाली. परिसरात शोध घेऊनही मुलगा सापडत नसल्याने आईने थेट टिळकनगर पोलीस ठाणे गाठले. तेथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय आफळे यांनी तात्काळ पोलिसांचे पथक तयार करुन मुलगा राहत असलेल्या घरापासून ते परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांची पथके परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहत असताना त्यांना दोन-तीन फुटेजमध्ये मुलगा 90 फुटी रस्त्याने ठाकुर्ली रेल्वे स्थानकाकडे जात असल्याचे आढळून आले.

खाकी वर्दीतील माणूसकी

फुटेजवरून मुलाचा शोध घेत असताना पोलिसांनी दुपारी अडीच वाजता ठाकुर्ली रेल्वे स्थानक गाठले. त्यांना सीसीटीव्हीमध्ये दिसणारा मुलगा बाकड्यावर बसल्याचे आढळून आले. साध्या वेशातील पोलीस प्रवासी म्हणून मुलाच्या शेजारी जाऊन बसले. बाळा तू कोठुन आला आहेस ? कुठे चालला आहे ? तुझे रेल्वे तिकीट कुठे आहे ? असे बोलून मुलाचा विश्वास संपादन केला. यावेळी मुलाने आपल्या समजुतीने उत्तरे दिली. पोलिसांनी मुलाला गोडीगुलाबीने पोलिस ठाण्यात आणले. त्याला पाणी पाजले. खाऊची विचारणा केली. पोलीस आपले काका आहेत हे समजल्यावर मुलाने माहिती दिली.

पोलिस ठाण्यातील भावूक वातावरण आणि मातेचा हंबरडा

सकाळी आई ओरडली म्हणून मी घर सोडून रागाने बाहेर पडलो, असे उत्तर वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय आफळे यांना दिले. असे कधी करायचे नसते, आईवर कधीही रागवू नये, असे बोलून आफळे यांनी या मुलाची समजूत काढली. मुलाचा राग ओसरल्याचे दिसल्यावर पोलिसांनी त्याच्या आईशी संपर्क साधला. भेदरलेली आई पोलीस ठाण्यात येताच मुलाला पाहून घट्ट मिठीत घेऊन आईने हंबरडा फोडला. यावेळी पोलीस ठाण्यातील वातावरण भावूक झाले होते. यापुढे असे काहीही न करण्याची समज या मुलाला पोलिसांकडून देण्यात आली. पोलिसांच्या तत्पर हालचालींमुळे मुलगा मिळाल्याने पालकांनी पोलिसांचे कौतुक केले.

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news