

ठाणे : ठाण्यात उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या रेमंड कॉम्पलेक्स मधील इमारतीची लिफ्ट कोसळल्याची घटना सोमवारी (दि.२१) सायंकाळीच्या दरम्यान घडली. या दुर्घटनेत चौघेजण थोडक्यात बचावले असून त्यांना लिफ्टमधून सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन विभागाला यश आले आहे. तर एक मुलगा किरकोळ जखमी झाला असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
ठाण्यातील वर्तनगर परिसरात रेमंड कॉम्पलेक्स हे उच्चभ्रू गृहसंकुल असून संध्याकाळी ७ च्या सुमारास या कॉम्पलेक्स मधील विस्टा बिल्डिंगच्या ए विंग (तळ + ४१ मजली) मधील एका लिफ्टचा रोप तळ मजल्यावरून वरती जात असताना पहिल्या मजल्यावर असताना तुटला. त्यामुळे लिफ्ट तळ मजल्यावर कोसळली. या प्रकारची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर घटनास्थळी वर्तकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान ०१- इमर्जन्सी टेंडरसह तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०१- पिकअप वाहनासह पोहचले.
या दुर्घटनेत शुभ शंतनु मंगरूळकर (वय ११) याच्या डाव्या पायाला अत्यंत किरकोळ दुखापत झाली असून नरेश शर्मा (३०) यांच्यासह दोन अज्ञात कामगार या लिप्टमध्ये होते. या चौघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले. दरम्यान या घटनेमुळे इमारतीमध्ये राहणार्या नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. या लिफ्टची देखभाल करण्यात आली होती का, याची चौकशी करण्यात येणार आहे. ठाणे शहरात मोठमोठे टॉवर्स उभारण्यात आले असून लिफ्टची देखभाल, दुरुस्ती वेळेवर होत नाही. तसेच महानगरपालिका व अग्निशमन दलाच्या नियमांचेदेखील पालन होत नसल्याचे आढळून आले आहे.