लोकलमधून रेल्वे मार्गात उतरताना प्रवासी जखमी, डोंबिवली स्थानकातील घटना

Incident at Dombivli Railway Station | 60 वर्षीय वृद्धावर केडीएमसी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
Incident at Dombivli Railway Station
लोकलमधून रेल्वे मार्गात उतरताना प्रवासी जखमी, डोंबिवली स्थानकातील घटना संग्रहित फोटो
Published on
Updated on

डोंबिवली : मुलुंडच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या आयुष जतीन दोशी या 20 वर्षीय विद्यार्थ्याचा मंगळवारी सकाळी डोंबिवली ते कोपर स्थानकांदरम्यान लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी सकाळी एका 60 वर्षीय प्रवासी जबर जखमी झाला. डोंबिवली स्थानकात फलाट क्रमांक चार-पाचच्या दरम्यान लोकलमधून रेल्वे मार्गाच्या बाजुने उतरण्याचा प्रयत्न करत असताना हा प्रवासी पाय मुरगळून जखमी झाला. पायाला दुखापत झाल्याने त्याला रेल्वे स्थानकातील रेल्वे सुरक्षा बलाचे जवान आणि स्टेशन मास्तरांनी मदत करून उपचारासाठी केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

मायकल जाॅन्सन (60) असे जखमी प्रवाशाचे नाव आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकात सकाळच्या वेळेत तुडुंब गर्दी असते. फलाटावर पाय ठेवण्यास जागा नसते. लोकलमध्ये चढण्यासाठी प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते. या संदर्भात प्रवाशांकडून मिळालेली माहितीनुसार, बुधवारी सकाळी कल्याणच्या दिशेकडून एक प्रवासी सीएसएमटीकडे जाणाऱ्या अतिजलद लोकलने येत होता. त्याला डोंबिवली स्थानकात उतरायचे होते. स्थानकातील तुडुंब गर्दीमुळे फलाट क्रमांक पाचवर त्याला उतरता आले नाही. मायकल यांनी आपण डोंबिवलीला उतरलो नाही तर लोकल थेट ठाण्यात थांबणार असल्याने त्यांनी घाईघाईने डोंबिवली स्थानकात रेल्वे मार्गाच्या बाजुने फलाट क्रमांक चार आणि पाचच्या मध्यभागी उतरण्याचा निर्णय घेतला.

लोकलचे पायदान आणि रेल्वे मार्ग यांच्यात चार ते पाच फूटाचे अंतर असते. त्यामुळे लोकलमधून उतरताना मायकल यांनी रेल्वे मार्गात उडी मारली. मात्र खडी आणि खळग्यात आदळल्याने त्यांचा पाय मुरगळला. यात त्यांच्या पायाला दुखापत झाली. बराच वेळ ते रेल्वे मार्गात बसून होते. इतक्यात गस्तीवरील रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांसह काही पादचाऱ्यांनी मायकल यांना रेल्वे मार्गातून फलाटावर आणले. रेल्वे स्टेशन मास्तर बिटू गुप्ता आणि जवानांनी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या साह्याने मायकल यांना अधिक उपचारासाठी केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

मायकल नावाचा प्रवासी फलाट क्रमांक चार-पाचमधील रेल्वे मार्गात लोकलमधून उतरताना पडला होता. पण तो मुंबईहून येणाऱ्या की मुंबईकडे जाणाऱ्या लोकलमधून पडला, हे निश्चित समजू शकले नाही. रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानाने जखमी अवस्थेतील प्रवाशाला आपल्या कार्यालयाकडे आणले. त्याला उपचारासाठी केडीएमसीच्या हॉस्पिटलला हलविल्याचे स्टेशन मास्तर बिटू गुप्ता यांनी सांगितले.

जीवघेण्या अपघातांच्या पुनरावृत्तींची दहशत

गर्दी असली तरी प्रवाशांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकलमधून रेल्वे मार्गात उतरू नये, असे आवाहन स्टेशन मास्तर बिटू गुप्ता यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना केले.

मंगळवारी सकाळी डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान लोकलमधील गर्दीमुळे डब्यात घुसता न आल्याने आयुष दोशी या विद्यार्थ्याचा लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस लोकलची गर्दी वाढत चालली आहे. अपघातांच्या पुनरावृत्ती वारंवार घडत आहेत. एकीकडे गर्दी आणि दुसरीकडे जीवघेण्या प्रसंगांची भीती या साऱ्याला कंटाळून ठाणे-मुंबईकडे नोकरीसाठी जाणाऱ्या काही वयस्कर नोकरदारांनी स्वेच्छानिवृत्ती पत्करल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news