National Investigation Agency
National Investigation AgencyPudhari News Network

Thane News | डोंबिवलीकर पर्यटक कुटुंबीयांची राष्ट्रीय तपास यंत्रणेने घेतली भेट

Pahalgam Terror Attack : प्रत्यक्षदर्शीची चौकशी सुरू
Published on

डोंबिवली : जम्मू-काश्मीरच्या पेहलगाम (बैसरन) येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या तिघा डोंबिवलीकर पर्यटकांच्या कुटुंबीयांतील प्रत्यक्षदर्शीची एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. एनआयएच्या पथकाने गुरूवारी (दि.24) रोजी संध्याकाळी डोंबिवलीत येऊन संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने यांच्या कुटुंबीयांची चौकशी केली. मंगळवारी हल्ला झाला त्यादिवशी घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाने पीडित कुटुंबीयांतील प्रत्यक्षदर्शीकडून घेतली.

Summary

घरातील कर्त्या सदस्याला दहशतवाद्यांनी आपल्या समोरच अतिशय क्रूर पध्दतीने मारल्याने लेले, मोने आणि जोशी कुटुंबीय पुरते हादरून गेले आहेत. या धक्क्यातून सावरलेले नाहीत. दुःखाचे सावट कायम असलेल्या संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी यांच्या कुटुंबीयांची गुरूवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने डोंबिवलीत येऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांची राहत्या घरी भेट घेतली.

पहलगामच्या बेसरन भागात पर्यटन करत असताना दहशतवादी कुठून आले? ते कोणत्या वेशात होते ? दहशतवाद्यांकडून हल्ल्याची घटना घडत होती, त्यावेळी आपण काय करत होता ? दहशतवादी आपल्यापर्यंत पोहचले त्यावेळी आपण काय भूमिका घेतली ? इतर पर्यटक त्यावेळी काय करत होते ? आदी अनेक प्रश्न उपस्थित करत राष्ट्रीय तपास यंत्रणेने लेले, जोशी आणि मोने कुटुंबीयांना शोकाकुल अवस्थेत बोलते करण्याचा प्रयत्न केला. ही माहिती देत असताना या तिन्ही कुटुंबातील प्रत्येक सदस्याला शोक आवरणे कठीण जात होते. त्यांच्या तोंडून शब्दही फुटत नव्हते. एनआयएच्या पथकाला त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची या कुटुंबीयांची मानसिकता दिसत नव्हती. अशा दुःखद आणि शोकाकुल वातावरणात माहिती घेणे उचित होणार नाही. परिपूर्ण माहिती अशा पध्दतीने घेणे योग्य ठरणार नसल्याने राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने चौकशी तूर्त थांबविली. मिळालेली जुजुबी माहिती घेऊन गेलेले हे पथक पुढील चौकशीसाठी येत्या चार दिवसांनी पुन्हा डोंबिवलीत दाखल होणार आहे. त्यावेळी लेले, मोने आणि जोशी कुटुंबातील जे सदस्य पहलगाम येथे पर्यटनासाठी गेले होते त्या प्रत्येक प्रत्यक्षदर्शीकडून हल्ल्याच्या वेळच्या घटनेची माहिती तपास पथक करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

सरकारने जशास तसे उत्तर द्यावे

आपले वडील, काका, मामांना जितक्या क्रूरपणे आमच्या समोरच मारले, त्या दहशतवाद्यांना सरकारने जशास तसे उत्तर द्यावे. त्यांची गय करू नये. त्यांना दिसता क्षणीच गोळ्या घालून ठार मारावे. मग ते दहशतवादी देशाच्या कोणत्याही सीमेवर असू दे, त्यांना जागेवरच ठोकून काढण्याची गरज असल्याची तीव्र भावना दिवंगत संजय लेले यांचा मुलगा हर्षल याने माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केली.

दिसताक्षणी गोळ्या घालण्याची मागणी

आमच्या कुटुंबीयांवर हल्ला करणारे पर्यटक सिनेमातील दृश्यातील दहशतवाद्यांप्रमाणे पोशाख करून आले होते. त्यांच्या कपाळावरती गोप्र कॅमेरा होता. तुम्ही काश्मीरमध्ये दहशत माजवली असल्याचे सांगून तुमच्यात हिंदू कोण आहेत ? असा सवाल करत दहशतवाद्यांनी संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने यांनी हात वर करताच त्यांच्यावर बेछूट गोळ्या झाडून पलायन केले. अशा दहशतवाद्यांना दिसताक्षणी गोळ्या घातल्या पाहिजेत, अशी अपेक्षा हर्षल यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news