

टिटवाळा : टिटवाळा पश्चिमेतील वासुंदरी रोड परिसरात सोमवारी सायंकाळी अचानक लागलेल्या आगीमुळे एकच खळबळ उडाली. जानकी विद्यालयाच्या नजीक असलेल्या सोसायटीतील ए विंगच्या तिसऱ्या मजल्यावरील एका सदनिकेत इन्व्हर्टरमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग भडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण करत घरातील साहित्याला वेढा घातल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
वासुंदी रोडवरील गणेश प्रतिमा सोसायटीतील तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या शालिक बागुल यांच्या सदनिकेत ही घटना घडली. घटनेच्या वेळी घरात कोणीही उपस्थित नसल्याने आग वेगाने पसरत गेली. घरातून धुराचे लोट बाहेर पडू लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी तत्काळ प्रशासनाला माहिती दिली. सूचना मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस यंत्रणेकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आगीच्या तीव्रतेमुळे सदनिकेतील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच इतर घरगुती साहित्य मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाले. संभाव्य धोका लक्षात घेऊन काही काळासाठी सोसायटीतील रहिवाशांना घराबाहेर काढण्यात आले होते. दरम्यान या घटनेत आगीचे लोळ इतर सदनिकांकडे पसरण्याआधीच नियंत्रण मिळवण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळल्याचा दिलासा नागरिकांनी व्यक्त केला.