

भाईंदर : मीरारोड येथील प्लेझंट पार्क परिसरातील सर्वे क्रमांक 53 वरील खाजगी मोकळ्या जागेत बेकायदेशीरपणे थाटण्यात आलेल्या तब्बल 19 फर्निचरच्यादुकानांना शनिवारी मध्यरात्री 3.15 वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. दुकानांमधील सर्व फर्निचरसह वाहने, वातानुकूलित यंत्रे आदी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे दिसून आले.
यापूर्वी देखील येथील फर्निचरच्या दुकानांना दोन वेळा आग लागण्याच्या घटना घडल्या असून या बेकायदेशीरपणे थाटण्यात आलेल्या दुकानांकडे पालिकेचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा संताप स्थानिकांनकडून व्यक्त केला जात आहे. कारण प्रत्येक आगीच्या घटनेतील धुराचे लोट आसपासच्या इमारतीतील लोकांच्या घरात पसरून त्यांना श्वास घेणे त्रासदायक ठरते. या दुकानांवर कारवाई करून जागा मोकळी करण्याबाबत अनेकदा तक्रारी करूनही प्रभाग अधिकारी प्रियंका भोसले त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष सिद्धेश राणे यांनी केला आहे. केवळ हप्तेखोरी करीत लोकांचा जीव प्रभाग अधिकाऱ्यांच्या गैरकारभारामुळे धोक्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
या परिसरात मोठ्याप्रमाणात गर्दुल्ल्यांचा वावर असतो. रात्रीच्यावेळी हे गर्दुल्ले येथील फर्निचरच्या दुकानांलगत मादक द्रव्य प्राशन करीत असतात. त्यातच एखाद्या गर्दुल्ल्याकडून येथील फर्निचरच्या दुकानांना आग लावण्याचा उपद्य्वाप केला जात असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.
आग शनिवारी मध्यरात्री 3.15 वाजताच्या सुमारास लागली असता त्याची माहिती तात्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या गाड्यांसह वॉटर टँकर घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरुवात केली. मात्र आगीने येथील तब्बल 19 दुकानांतील लाकडी फर्निचरसह तेथील वाहने व वातानुकूलित यंत्रे आदी साहित्य आपल्या कुशीत घेतल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात अडसर निर्माण होत होता. सकाळी 10 वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. त्यात सुमारे 5 चार चाकी वाहने, 2 स्कुटर, 6 वातानुकूलित यंत्रे, 19 दुकानांमधील भंगारासह विविध प्रकारचे फर्निचर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने सुमारे 2 कोटींचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाचे प्रभारी मुख्य अधिकारी प्रकाश बोराडे यांनी वर्तविला आहे.