

ठाणे : करोडो रुपयांचे फ्लॅट खरेदी करूनही घोडबंदर पट्ट्यातील रहिवाशांना पाण्यासारख्या मूलभूत सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. पुरेसे पाणी मिळत नसल्याने या पट्ट्यातील बहुतांश सोसायट्यांना टँकरच्या मागे महिन्याला लाखो रुपये मोजावे लागत आहेत. या गंभीर प्रश्नावर मनसेचे नेते अविनाश जाधव आणि घोडबंदरमधील रहिवासी यांनी मंगळवारी पालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास ही गंभीर बाब आणली.
ठाण्यात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत असून यामुळे या ठिकाणी राहायला येणार्या नागरिकांची संख्या देखील मोठी आहे. विशेष करून घोडबंदर भागात मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले असून मोठ्या प्रमाणात मोठमोठी गृहसंकुले देखील उभी राहिली आहेत. पालिकेकडून इमारती उभारण्यासाठी परवानगी दिली जाते, मात्र याचा बोजा सोयीसुविधा पुरवताना होत असून पाण्यासारख्या मूलभूत सुविधांपासूनही घोडबंदर विभागातील नागरिकांना वंचित राहावे लागत आहे.
मंगळवारी त्रासलेल्या घोडबंदर रहिवाशांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या समवेत आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांना ही गंभीर समस्या सांगितली. आयुक्तांनी यासंदर्भात तोडगा काढण्याचे आश्वासन दिले तरी, यामागे मोठा टँकर घोटाळा असल्याचा आरोप मनसेे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे.
घोडबंदरसाठी 144 एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. ठाणे महापालिकेकडून जवळपास 110 एमएलडी पाणीपुरवठा होतो. केवळ 4 एमएलडीच पाणी पुरवठा कमी होत असताना नेमके हे पाणी चोरीला जाते कुठे असा प्रश्न अविनाश जाधव यांनी उपस्थित केला आहे. तर हा प्रश्न घोडबंदरच्या रहिवाशांना पडला असल्याचे या रहिवाशांचे म्हणणे आहे.
विकासक आणि टँकरमाफियांचे लागेबांधे...
घोडबंदर भागात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्पांची कामे सुरू असून या ठिकाणी एकही टँकर दिसत नाही. मग या बांधकामांना नेमके पाणी कुठून दिले जाते. याशिवाय पालिकेचा टँकर मागवला की, रहिवाशांना हजार रुपये मोजावे लागतात. मात्र खासगी टँकर मागवला की, अडीच ते तीन हजार रुपये मोजावे लागत असून जर एकाच ठिकाणी टँकर भरला जात असेल, तर ही तफावत का? असा प्रश्न उपस्थित करत या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी अविनाश जाधव यांनी केली आहे.