

ठाणे : ठाणे महापालिकेचे लाचखोर उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाचा सर्व तपास आता ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाकडे हस्तांतरित केल्यानंतर आता ठाणे लाचलुचपत विभागाने तपासाला सुरुवात केली आहे. यामध्ये शंकर पाटोळे यांच्या संपूर्ण संपत्तीची चौकशी देखील होण्याची शक्यता आहे. यामध्ये पाटोळे यांच्या वैयक्तिक संपत्तीचीच चौकशी होणार नसून त्यांच्या गावची आणि त्यांच्या नातेवाईकांची चौकशी देखील होण्याची शक्यता आहे.
विकासक अभिजित कदम यांच्याकडून 25 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी मुंबई लाचलुचपत विभागाकडून ठाणे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांची सुमारे पाच तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर हा संपूर्ण तपास ठाणे लाचलुचपत विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. सोमवारी पाटोळे यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
आज पुन्हा त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्यांच्या जमीन अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान एका सरकारी अधिकार्यावर लाचलुचपत विभागाने केलेली ठाणे जिल्ह्यातील ही सर्वात मोठी दुसरी कारवाई असल्याचे बोलले जात असून या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी होण्याची शक्यता आहे.
आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता
लाचलुचपत विभागाने कारवाई केल्यानंतर शंकर पाटोळे यांची नेमकी संपत्ती किती आहे याबाबत पालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. मात्र तपासाचा भाग म्हणून ठाणे लाचलुचपत विभागाकडून पाटोळेंच्या संपूर्ण संपत्तीची देखील चौकशी करण्यात येणार आहे. केवळ पाटोळेच नाही तर त्यांचे नातेवाईक आणि त्यांच्या गावापर्यंत चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. सध्या ज्या दिवशी घटना घडली त्यासंदर्भातील पुरावे तपासण्याचे काम या विभागाकडून सुरू आहे. 15 ते 20 दिवसांमध्ये सखोल चौकशी झाल्यानंतर पाटोळेंच्या विरोधात आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.