

डोळखांब : दिनेश कांबळे
एकीकडे 25 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय कलावंत दिन साजरा होत असताना, ‘शहापूर’ या कलावंताच्या पंढरीत आजही नाट्यगृह नसल्याने येथील विविध क्षेत्रातील कलाकारांची परवड होत आहे.
शहापूर हा खरे पाहाता दुर्गम, डोंगराळ, तसेच विविध पारंपरिक लोककलावंताचा तालुका मानला जातो. गेली तीन दशके येथे भारूड, रामलीला, बोहाडे, तसेच फिरते तमाशे यासारख्या पारंपरिक लोककला मोठ्या आवडीने जोपासल्या जायच्या. त्याकाळात या कलावंताना मोठी मागणी ही होती; परंतु कला जोपासण्यासाठी हक्काचे व्यासपीठ नव्हते, तर इमारत ही नव्हती आजही या परिस्थितीत बदल झालेला नाही.
तालुक्यातील डोळखांब परिसरातील भिनार गावात संयुक्त महाराष्ट्राचे चळवळीत हिरीरीने भाग घेणारे तसेच शाहीर अमर शेख, सिनेकलावंत दादा कोंडके यांचा सहवास लाभलेले शंकरराव कुलकर्णी राहात होते. तर गानकोकिळा लता दिदी मंगेशकर यांचा सहवास लाभलेले मनोहर कदम शहापुरात राहात होते. या दोन्ही व्यक्ती आज हयात नाहीत. यानंतर तालुक्यात नाट्यकला जिवंत ठेवण्याचे पवित्र काम डोळखांब परिसरातील पंढरीनाथ पांढरे यांनी गेले दोन दशके केले आहे.
या कार्यात टहारपूर भावसे येथील काही नाट्यप्रेमी हौशी कलाकार ही मागे नव्हते. पांढरे यांच्या सह्याद्री कलासंघ या नाट्य संस्थेतील सुभाष शिंदे, महेश फाळके, दीपक सरोदे या कलाकारांनी अनेक मालिकांमध्ये तसेच सिनेमांमध्ये अभिनय करून नावलौकिक मिळवला आहे.“ दाताचं दातवण घ्या गं कुणी, कुंकू घ्या, कुणी काळं मणी, या गिताचे कवी प्रकाश पवार हे देखील शहापूर तालुक्यातील कसारा गावचे सुपुत्र.
या कलाकारांनंतर सद्या नवोदित बासरी वादक, ढोलकीवादक, नाट्य कलवंत, हार्मोनियम वादक, कीर्तनकार, मंगलाष्टके गायक सुमेध जाधव यांसारखे संगीतकार शहापुरात उदयास आले आहेत. या कलाकार मंडळीत दिवसेंदिवस भर पडत असून अनेक कलाकारांनी संघटना निर्माण करून तालुक्यात चांगले काम सुरू केले आहे.
कलाकारांचा विचार होईल का?
या सर्व लोककलांची जागा आज टीव्ही चॅनलने घेतली असली तरी इतर शहरांच्या बरोबरीने शहापुरात देखील कलाकारांसाठी हक्काचे नाट्यगृह असणे गरजेचे आहे. 25 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय कलावंत दिन साजरा होत असतांना शहापुरातील पक्ष कलाकारांचा विचार करतील का?
कलाकारांना प्रोत्साहन आवश्यक
रवींद्र पितळे, शिरीष पितळे, मनीष व्यापारी, यांसारख्या मोठमोठ्या कलाकारांना रंगभूषा करणारे रंगकर्मीही शहापूर नगरीतच राहतात; परंतु कलाकारांच्या या भाऊगर्दीत याच कलाकारांना प्रोत्साहन मिळावे किंवा तालुक्यात विविध स्वरूपाचे कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी हक्काचे नाट्यगृह किंवा सांस्कृतिक भवन, करमणूक गृह नाही. कधी काळी शहापूरकरांच्या करमणुकीसाठी असलेली शाम टॉकीज ही पडद्याआड झाल्याचे दिसते.