

ठाणे : प्रदूषणकारी फटाके टाळा असे आवाहन करूनही यावर्षी ठाण्यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणारे फटाके वाजवण्यात आले असून यामुळे ठाण्याच्या प्रदूषणात गतवर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. यावर्षी फटाके वाजवणाऱ्यांची संख्या देखील वाढली असून यामुळे यावर्षी प्रदूषण 7 टक्क्यांनी वाढले आहे. तर ध्वनी प्रदूषणात देखील वाढ झाली असल्याची माहिती पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने दिली आहे.
दिवाळीच्या सणानिमित्ताने आणि विशेष करून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाकडून दिवाळीपूर्वी आणि दिवाळीमधील हवेची गुणवत्ता तपासली जाते. यावर्षी देखील हवेची गुणवत्ता तपासण्यात आली असून यावर्षी ठाण्याची हवा आणखी प्रदूषित झाली आहे. नागरिकांनी याही वर्षी दिवाळी सण उत्साहाने साजरा केला असून या काळात फटाके वाजण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. मात्र, संध्याकाळी झालेल्या पावसामुळे तेवढ्या काळात प्रदूषणापासून काहीसा दिलासा मिळाला.
अर्थात, यंदा दिवाळीपूर्वीची हवेची गुणवत्ता व दिवाळीच्या काळातील हवेच्या गुणवत्तेचा विचार करता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रदूषणाच्या पातळीत सरासरी 11.1 टक्के वाढ नोंदवली. तर, दिवाळीच्या कालावधीत ध्वनीच्या पातळीत 3.2 टक्के वाढ नोंदली गेली आहे. 2024 च्या दिवाळी कालावधीतील हवेच्या गुणवत्तेशी तुलना केली असता यंदा हवेतील प्रदूषण पातळीत 7.2 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या 3 वर्षाच्या दिवाळीच्या कालावधीतील वायू प्रदूषणाचे मूल्यमापन केले असता असे निदर्शनास येते की, 2023 मध्ये दिवाळी कालावधीत हवा गुणवत्ता निर्देशांकामध्ये 62.6 टक्के इतकी वाढ झाली. 2024मध्ये दिवाळी कालावधीत निर्देशांकात 33.9 टक्के वाढ झाली होती.
यंदा पावसामुळे प्रदूषणात काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र दिसत असले तरी पाऊस थांबल्यानंतर धुलिकणात अचानक मोठी वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. ही धोकादायक स्थिती आहे. त्यावर मात करण्यासाठी केवळ हरित फटाक्यांकडे आपला कल नेणे ही काळाची गरज आहे. पावसामुळे ठाण्यातील सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम पातळीवरच राहिला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रदूषणामध्ये सरासरी 11.1 टक्के वाढ नोंदली गेली, असे ठाणे महापालिकेच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी सांगितले.
हवा गुणवत्तेचा तुलनात्मक अभ्यास...
महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने ठाणे शहरात दिवाळी 2025 कालावधीतील हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास केला. मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली उप पर्यावरण अधिकारी विद्या सावंत आणि ज्युनिअर केमिस्ट ओमसत्याशिव परळकर यांनी हा अभ्यास केला. या अभ्यासात, दीपावली पूर्व व दीपावली कालावधीत (लक्ष्मीपूजन) ठाणे शहरातील हवेची गुणवत्ता तपासण्यात आली. त्यानुसार11 ऑकटोबर रोजी दीपावली पूर्व कालावधीत हवेतील गुणवत्ता निर्देशांक 141 इतका होता. तर,21 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवा गुणवत्ता निर्देशांक 157 इतका होता. दिवाळीच्या कालावधीत ध्वनीच्या पातळीत 3.2 टक्के वाढ नोंदली गेली आहे. गतवर्षी हे प्रमाण 86 एलमॅक्स एवढे होते. तर, यंदा 89.2 एलमॅक्स एवढे प्रमाण नोंदले गेले आहे.