

ठाणे: ठाण्यातील सावरकर नगर येथील म्हाडा वसाहत परिसरात लहान मुलांना पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र नागरिकांनी सतर्कता बाळगल्याने संशयित भगवान बेहरा नामक व्यक्तीला पकडून नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. वर्तकनगर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावरकर नगरमधील साईप्रसाद सोसायटी आणि शांतीदूत सोसायटी परिसरात काही लहान मुले गुरुवारी खेळत असताना एका व्यक्तीने दोन ते तीन मुलांना अचानक उचलून नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. हा प्रकार लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली.
संतप्त नागरिकांनी तत्काळ संबंधित व्यक्तीला पकडून त्याची चौकशी केली. त्यानंतर संशयिताला वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याची ओळख भगवान बेहरा (वय 33, मूळ रा. ओडिशा) अशी पुढे आली.
तो सध्या परिसरातील एका बांधकाम प्रकल्पावर मजूर म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा एक व्हिडिओ ही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अनेक नागरिकांनी मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करून भगवान बेहरा याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती वर्तकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण माने यांनी दिली.