

ठळक मुद्दे
राज्यात 21 ऑगस्टपर्यंत मुसळधार
पुणेसाठी रेड अलर्ट, विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट तर राज्यातील इतर भागांमध्ये यलो अलर्ट
अतिवृष्टीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता उद्यापर्यंत सुट्टी
Two-day holiday for school students due to heavy rain
ठाणे : ठाणे शहरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता ठाणे महानगरपालिका परिक्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, खाजगी तसेच अनुदानित आणि विना अनुदानित अशा सर्वच शाळांच्या विद्याथ्यांना सोमवार ( दि.18 ऑगस्ट) ते मंगळवार ( दि.19 ऑगस्ट) पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
ठाणे महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या निर्देशानुसार सोमवार ( दि.18 ऑगस्ट) आज दुपार सत्रातील चालू असणा-या शाळांतील विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी सोडण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांना देण्यात आलेल्या आहेत. मुख्याध्यापक व शिक्षक यांनी सर्व विद्यार्थी घरी सुखरूप पोहोचल्याची खात्री झाल्याशिवाय आज शाळा मुख्यालय सोडू नये, असे कळविण्यात आले आहे. तसेच सोमवार ( दि.18 ऑगस्ट) ते मंगळवार ( दि.19 ऑगस्ट) रोजी नियोजित असणारी सर्व प्रशिक्षणे, परीक्षा, इत्यादी नजीकच्या काळामध्ये शाळांनी आपआपल्या स्तरावर पूर्ण करण्याचे नियोजन करावे, सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना शाळा स्तरावरुन तात्काळ अवगत करण्यात यावे असे सांगण्यात आले आहे.
राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यानंतर आता जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने 21 ऑगस्टपर्यंत अतिवृष्टी आणि वादळी वार्याचा इशारा दिला आहे. पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट, विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट, तर राज्यातील इतर भागांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांत संततधार पाऊस सुरू असून पावसाचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने ठाणे आणि मुंबईसाठीही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे. सकाळी सुरू असलेल्या पावसाचा जोर दुपारी आणि सायंकाळीही कायम राहण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.