

Mumbai rain waterlogging latest update
मुंबई : सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने मुंबई शहर आणि उपनगर पुन्हा तुंबले आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेची उपनगरीय सेवा उशिराने धावत असून, अनेक ठिकाणी पाणी साचल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विमानसेवेवरही पावसाचा परिणाम जाणवत आहे.
मुंबई शहरातील सायन, हिंदमाता, किंग्ज सर्कल, अंधेरी, विरार, वसई, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे आदी भागांत रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे अर्ध्या तासाच्या प्रवासाला एक ते दीड तास लागत आहे. चेंबूर परिसरात सकाळी ९ ते १० या एक तासात ६५ मिमी पाऊस झाला. टाटा पॉवर चेंबूर ८१.५ मिमी, सांताक्रूझ ७० मिमी, विक्रोळी ६९ मिमी, सायन ६७ मिमी, जुहू ५८ मिमी, भायखळा ५८ मिमी, बांद्रा ५४ मिमी, कुलाबा २२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मुंबईसह कोकणात रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील तीन ते चार तास अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षातील १९१६ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत पावसाचा जोर आणखी वाढल्यास जनजीवन अधिक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे.