

ठळक मुद्दे
हवामान विभागाकडून पुढील काही दिवसांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी
कोकण, मराठवाडा, विदर्भातील नद्या धोक्याच्या पातळीवर
मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण
ठाणे : मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसांत मुंबईत पाच वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भातील नद्या धोक्याच्या पातळीवर असून, अनेक ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर प्रशासन सतर्कतेच्या सूचना देत आहे.
गेल्या 24 तासांत मुंबईत 244.7 मिमी पावसाची नोंद झाली असून, ही पाच वर्षांतील सर्वाधिक नोंद आहे. सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक आणि लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. जालना, नांदेड, जळगाव, धाराशिव, परभणी, बीड या जिल्ह्यांत पावसामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. काही ठिकाणी पिकांना दिलासा मिळाला असला, तरी अनेक भागात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
नांदेडच्या ईसापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, किनवट तालुक्यातील गावे पुराच्या वेढ्यात आहेत. सातारा जिल्ह्यातील कोयना आणि कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून, पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
हवामान विभागाने 16 ते 21 ऑगस्टदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, जळगाव, नांदेड, जालना, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, कोकणातील जिल्ह्यांना रेड-ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. धाराशिव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील महत्त्वाचा तेरणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. यामुळे परिसरातील शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. धाराशिव, तेर, ढोकी या गावांचा पाणीप्रश्नही मिटणार आहे.
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत नद्यांचे पाणी पात्राबाहेर गेले आहे. कोकणातील वाशिष्ठी, जगबुडी, गड या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. विदर्भातही अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी दिवस-रात्र पावसाने जोरदार हजेली लावली असून तब्बल 749.98 मिमी पावसाची नोंद झाली आहे.