

Thane railway station waste collection
ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकावरील कर्मचाऱ्यांच्या सांगण्यानुसार दर दिवशी ठाणे रेल्वे स्थानकावर तब्बल 75.83 किलो घन कचरा आढळतो. व जमा केलेला घनकचऱ्याचा बंदोबस्त ठाणे महानगरपालिकेकडे नियमित करण्यात येतो. दरम्यान दिवसेंदिवस वाढत्या कचऱ्याचा होणारा निचरा रेल्वे कर्मचाऱ्यांकडून नेहमी नियोजन करून आटोक्यात आणले जाते. परंतु लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस रेल्वे प्रवाश्यांमुळे कुठे तरी नियमित ठाणे रेल्वे स्थानकावरील स्वच्छता राखत असताना स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामाला गालबोट लागत असल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
अलीकडे काही वर्षांपासून अशी परिस्थिती उद्भवत असल्याचे सफाई कर्मचाऱ्याने सांगितले. या अगोदर एक्स्प्रेस रेल्वेमधील घनकचऱ्याचे नियोजन एक्स्प्रेसमधल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून करण्यात यायचे. मात्र काही वर्षांपासून स्वच्छतेचा अभाव दिसून येत असल्याने ठाणे रेल्वे स्थानकावरील स्वच्छता कर्मचाऱ्यांचे नियोजन चुकते. तसेच दर दिवशी सकाळी आणि संध्याकाळी ठाणे रेल्वे स्थानकावरील 10 फलाट कर्मचाऱ्यांकडून स्वच्छ करण्यात येते. परंतु वारंवार स्वच्छ करून सुद्धा बहुतांश वेळा कचऱ्याचा निचरा रेल्वे ट्रॅकवर, फलाटांवर व रेल्वे स्थानकावर ठिकठिकाणी आढळतो. ठाणे रेल्वे स्थानक महाराष्ट्र राज्यातील मुख्य आणि सक्रिय रेल्वे स्थानक आहे.
ठाणे रेल्वे स्थानकावर दररोज 600 रेल्वे सेवा प्रवास करत असतात. त्यापैकी 248 लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस रेल्वे सेवा आहेत. काही आराखड्यानुसार 600 रेल्वेच्या तुलनेत नियमित 8 लाख परतावाही प्रवास करतात. प्रवासादरम्यान बहुतांश प्रवासी रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, खाद्य पदार्थांचे वेष्टन आयोग्यपणे टाकत असतात आणि त्याच रिकाम्या बाटल्या, वेष्टन इतर ठिकाणी पसरत असते; परंतु अशा प्रवाश्यांच्या अस्वच्छतेमुळे रेल्वे स्थानकावर नियमित कचऱ्याचे प्रमाण वाढताना दिसते.
रिकाम्या बाटल्यांचे ढीग
या पार्श्वभूमीवर काही यंत्रणा स्वच्छतेसंदर्भात स्वच्छता कर्मचाऱ्यांना वेठीस धरतात. तसेच अलीकडे त्या कचऱ्यामध्ये भर म्हणजे एक्स्प्रेसमधून टाकण्यात येणाऱ्या रिकाम्या बाटल्या. प्रवाश्यांच्या अशा कृतीमुळे स्वच्छतेदरम्यान खाद्यपदार्थांची वेष्टन आणि रिकाम्या बाटल्यांचे ढीग अति प्रमाणात आढळतात, असे सफाई कर्मचाऱ्याने सांगितले.