

ठाणे : बुधवारपासून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी कातकरींच्या विदारक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उत्तरदायित्वाची भावना म्हणून श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा आणि संस्थापक विवेक पंडित यांच्यासह राज्याच्या पदाधिकाऱ्यांनी ठाण्यात बुधवारपासून ‘आत्मक्लेशातून आत्मनिर्धार’ मौन पाळून आंदोलनास सुरुवात केली आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून आदिवासी बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर वस्तीच्या तयारीत धडकणार आहेत.
देश स्वातंत्र्याच्या शताब्दीच्या उंबरठ्यावर आहे. तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून केवळ काही किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या आदिम कातकऱ्यांच्या श्रमाचा अमानुष बाजार सुरू आहे. लहान मुलांचं बालपण खुडून नेलं जातंय, त्यांचं माणूस म्हणून जगणंच नाकारलं जातंय. दारिद्य्र, अन्याय आणि प्रशासनाच्या दीर्घकालीन अंमलबजावणीतील दिरंगाईमुळे हा आदिम समाज खुलेआम उद्ध्वस्ततेच्या मार्गावर उभा आहे. श्रमजीवी संघटनेने आता या आदिवासी जमातीसाठी आत्मक्लेशातून आत्मनिर्धाराचे निर्णायक पाऊल उचलले आहे.
निरक्षरता आणि दारिद्य्रामुळे अल्पवयीन मुलींची खरेदी-विक्री, कर्जबाजारीपणामुळे पुन्हा वाढलेली वेठबिगारी, स्थलांतरामुळे अर्ध्यावर राहिलेले शिक्षण आणि बालमृत्यूंच्या वाढत्या घटना या सर्वांनी कातकरी समाजाचे जीवन अंध:कारात लोटले गेले आहे. वनहक्क, गावठाण हक्क आणि मुक्त वेठबिगारांचे पुनर्वसन आजही प्रलंबित आहे.
यासाठी श्रमजीवी संघटनेचे राज्याचे पदाधिकारी श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, जनरल सेक्रेटरी बाळाराम भोईर, विजय जाधव, ठाणे जिल्हाध्यक्ष अशोक सापटे, पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड, संघटक सचिव सीता घाटाल, पूजा सुरूम - माळी, रुपेश डोले आणि ठाणे जिल्हा महिला प्रमुख जया पारधी, पालघर जिल्हा महिला प्रमुख रेखा पऱ्हाड इतर कार्यकर्ते पूर्ण दिवस उपवास करून आत्मक्लेश करत आहेत.
अन्यायकारक आणि मानवी संवेदनांना चिरडून टाकणाऱ्या आजच्या विदारक परिस्थितीकडे शासन आणि समाजाचे लक्ष वेधण्यासाठी श्रमजीवी संघटनेचा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘आत्मक्लेशातून आत्मनिर्धार सुरू असताना संघटनेच्या प्रत्येक गावा-पाड्यात प्रौढ सभासद दिवसभर उपाशी राहून आत्मक्लेश करून सायंकाळी प्रत्येक गावा गावात, पाड्या-पाड्यात आपल्या घरा-दारात नव्या आत्मनिर्धाराचा प्रतिकात्मक दिवा लावणार आहेत.
अस्तित्वासाठीचा ‘निर्धार’
आंदोलन स्थळीही आज हा दिवा संध्याकाळी लागणार आहे. आत्मक्लेशातून आत्मनिर्धार हा 5 आणि 6 नोव्हेंबर असे दोन दिवस होत आहे. गुरुवारी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून आदिवासी बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर वस्तीच्या तयारीत धडकणार आहेत. हा केवळ संघर्ष नसून परागंदा होत असलेल्या समाजाच्या अस्तित्वासाठीचा ‘निर्धार’ आहे, अशी माहिती श्रमजीवी संघटनेने आहे.