

ठाणे : दिल्लीत झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर देशासह, राज्यभरात ठिकठिकाणी इतर सुरक्षा यंत्रणांकडून नागरिकांना सतर्कतेचा संदेश देण्यात आला. अतिवर्दळीत क्षेत्र आणि लोकसंख्या जास्त असलेल्या ठिकाणांवर सुरक्षा यंत्रणा विशेष लक्ष ठेऊन आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानक, बस स्टॉप, आणि इतर ठिकाणांवर सुरक्षा यंत्रणा दक्ष असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. मध्य रेल्वे मार्गावरील इतर रेल्वे स्थानकांप्रमाणे ठाणे रेल्वे स्थानकावर सुद्धा प्रवाश्यांना सतर्क करण्यासाठी ठाणे रेल्वे सुरक्षा बल आणि ठाणे लोहमार्ग पोलिसांनी डॉग स्कॉड तपासणी फेरी आणि मॉकड्रील राबवले.
रेल्वे सुरक्षा बल आणि ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या म्हणण्यानुसार रेल्वे स्थानकाप्रमाणे अतिगर्दी असलेल्या ठिकाणांवर असे अमानुष स्फोट होण्याची शक्यता असते. अशा वेळी रेल्वे स्थानकावरील प्रवाश्यांनी अशी स्थिती ओढावल्यास कशी दक्षता पाळावी आणि कसे आपले जीव वाचवावे याकरिता रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांद्वारे समूह मॉकड्रील फलाट क्रमांक 2 वर राबवण्यात आले होते. तसेच सकाळी 11. 30 वाजताच्या सुमारास स्थानकावर आढळणाऱ्या संशयास्पद वस्तूंचा तपास करण्यासाठी श्वान पथकांचा फेरा राबवण्यात आला असून दरम्यान फेऱ्यात जिमी 298 आणि ब्रुनो 543 हे श्वान व त्यांना हाताळणारे अधिकारी उपस्थित होते.
ठाणे रेल्वे स्थानक गर्दीचे हॉटस्पॉट असून तिथे रेल्वे पोलिसांच्या निर्दर्शनात होणारी एखादी चूक तब्ब्ल 8 लाख प्रवाश्यांच्या जीवावर बेतू शकते. रेल्वे पोलिसांच्या म्हणण्यानुसार अशा संवेदनशील स्थितीत बारकाईने लक्ष्य देत गांभीर्यपूर्वक जबाबदारी योग्यपणे हाताळणे काहीशे अवघड होऊ शकते म्हणून या पार्श्ववभूमीवर रेल्वे पोलिसांच्या म्हणजेच रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आला आहे.
अशा परिस्थितीत प्रवासी आपलाआपल्या गंतव्यस्थानी सुखरूप पोहचणे हेच आमचे लक्ष्य असे ठाणे रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक प्रवीण महाजन यांचे म्हणणे आहे. तसेच इतर लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने ठाणे रेल्वे स्थानकावरील कानाकोपऱ्यातल्या जागेची अथवा त्या जागेंवर आढळल्या वस्तूंची झडती घेण्यात आली. त्याचप्रमाणे प्रवाशांच्या सेवेसाठी अधिकाधिक उपाययोजना करून असे रेल्वे पोलिसांनी जाहीर केले.