

मुंबई : राज्यातील अभियांत्रिकी प्रवेशासाठी पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित), फार्मसी तसेच कृषी आणि वैद्यकीय मधील काही अभ्यासक्रमांसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी) अशा दोन परीक्षा एमएचटी सीईटी म्हणून घेतली जाणारी परीक्षा आणि एमबीए प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) आता वर्षातून दोनदा होणार आहेत. पहिली प्रवेश परीक्षा एप्रिल-2026 मध्ये तर दुसरी प्रवेश परीक्षा मे 2026 महिन्यात होणार आहे.
सीईटी कक्षाकडून राज्यभरात सध्या 73 अभ्यासक्रमांसाठी 19 विविध परीक्षा घेतल्या जातात. त्यात अभियांत्रिकी, फार्मसी, एमबीए आणि विधी या काही प्रमुख परीक्षांमध्ये लाखो विद्यार्थी सहभागी होतात. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्तरावर जेईई प्रमाणे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाही दोन प्रवेश संधी मिळाव्यात, या उद्देशाने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा केली.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, देशभरात जेईई परीक्षा दोन वेळा घेतली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याची संधी मिळते. आता महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाही तीच सुविधा उपलब्ध करून देत आहोत. पहिली सीईटी एप्रिल 2025 मध्ये आणि दुसरी मे 2025 मध्ये होईल. मात्र, विद्यार्थ्यांसाठी एक परीक्षा देणे बंधनकारक असेल; दुसरी ऐच्छिक असणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दोन संधी मिळणार असल्या तरी, त्यापैकी ज्या परीक्षेत अधिक गुण मिळतील, तेच प्रवेशासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सीईटी परीक्षांसंदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, सीईटी आयुक्त दिलीप सरदेसाई, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, तसेच उपसचिव अशोक मांडे आणि प्रताप लुबाळ उपस्थित होते.
सीईटी कक्षाकडून यासंबंधीचा अंतिम आराखडा व वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना केवळ अधिक संधीच मिळणार नाही, तर प्रवेशातील पारदर्शकता आणि स्पर्धात्मकतेलाही चालना मिळेल, असा विश्वास उच्च शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.
यंदा एमएचटी सीईटी परीक्षेसाठी 6 लाख 36 हजार 89 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) ग्रुपसाठी 3 लाख 33 हजार 41 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 3 लाख 13 हजार 732 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर 19 हजार 309 विद्यार्थी गैरहजर होते. पीसीबी ग्रुपसाठी 3 लाख 3 हजार 48 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी 2 लाख 77 हजार 403 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.