

ठाणे: सर्वसामान्य ठाणेकरांवर लादलेल्या करवाढीवरून भाजप शिवसेनेमध्ये आता आरोप -प्रत्यारोप सुरु झाले आहे. त्यामुळे ठाण्याचे राजकारण येत्या पुढील काळात रंगणार आहे.डबघाईला आलेल्या ठाणे महापालिकेला आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी मालमत्ता करामध्ये वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला.
या प्रस्तावाला ठाणे महापालिकेच्या सभागृहात देखील मंजुरी मिळाली आहे. मात्र या मंजुरीवरून आता भाजप आणि शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा संघर्ष निर्माण झाला आहे. या करवाढीचा भाजपच्या २८ नगरसेवकांनी आपला विरोध दर्शवला आहे.
निवासी मालमत्तांवर १२ टक्के, वाणिज्य मालमत्तांवर २० टक्के वाढीला विरोध; केला असून आधी थकबाकी वसुली करा, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.ही करवाढ सामान्य ठाणेकरांवर आर्थिक बोजा टाकणारी असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
करवाढीचा प्रस्ताव रद्द करावा, तसेच महापालिकेकडे प्रलंबित असलेली मोठ्या प्रमाणावरील मालमत्ता कराची थकबाकी प्रथम वसूल करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.या प्रस्तावावर सभागृहात अपेक्षित चर्चा न होता तो मंजूर करण्यात आल्याचा आक्षेप भाजपच्या नगरसेवकांनी घेतला आहे. उपमहापौर कृष्णा पाटील यांनी महापालिका आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांना पत्र देऊन करवाढीला स्पष्ट विरोध नोंदविला आहे.
भाजपच्या पत्रानुसार, ठाणे महापालिकेच्या उत्पन्नाचे विविध स्रोत असताना त्यातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळण्याची शक्यता आहे. मात्र, महापालिकेच्या मालमत्ता कर विभागासह शहर विकास, पाणीपुरवठा, जाहिरात विभाग तसेच एलबीटीसारख्या विविध विभागांकडील अंदाजे १२०० ते १५०० कोटी रुपयांची थकबाकी वसूल होणे बाकी असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांवर नव्याने करवाढ
लादण्यापूर्वी प्रशासनाने प्रलंबित थकबाकीची प्रभावीपणे वसुली करावी, अशी मागणी भाजपने केली आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना महायुतीला ठाणेकरांनी मोठ्या अपेक्षेने कौल दिला. नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची असताना करवाढीचा निर्णय घेणे योग्य नसल्याचे भाजपचे म्हणणे आहे. या करवाढीचा ठराव रद्द करण्यासाठी भाजपच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही मागणी करण्यात येणार असल्याचे उपमहापौर कृष्णा पाटील आणि गटनेते मुकेश मोकाशी यांनी स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे शिवसेनेने भाजपचे सर्व आरोप फेटाळून लावले असून गटनेत्यांच्या बैठकीत जी चर्चा होते त्याची अंमलबजावणी शिवसेनेकडून केली जाते. भाजपच्याच नगरसेवकांनी या विषयावर कोणत्याही प्रकारची चर्चा न करता हा विषय सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला असल्याचे शिवसेनेचे गटनेते हणमंत जगदाळे यांनी स्पष्ट केले आहे.
भाजप आमदार संजय केळकर यांनी पालिका प्रशासनाला याबाबत पत्र देऊन मालमत्ता करामध्ये जेवढी रक्कम वसूल होणार आहे ती आधी वसूल करा, मी तर यादी दिलेली आहे 2016 पासून किती मालमत्ता कर बाकी आहे ती कमीत कमी पाच ते सहाशे कोटी पर्यंत जाईल, यांचा ऑडिट रिपोर्ट देखील आलेला नाही, एकीकडे तुम्ही कर लावायला जाता पण जो बाकी आहे तो तरी वसूल करा, पाचशे ते साडेपाचशे कोटींची थकबाकी आहे ती तुम्ही वसूल करत नाही आणि छाती बडवत फिरत असाल पैसे नाहीत म्हणून, करवाड केली असेल तर काही हरकत नाही पण ती किती करायला हवी उगाच अव्वाच्या सव्वा दरात करवाड केली तर ती ठाणेकर सहन करणार नाहीत अशा शब्दात केळकर यांनी विरोध केला आहे.