

ठाणे: ठाणेकरांवर आता दुहेरी करवाढीचा बोजा पडणार आहे. सोमवारी झालेल्या महासभेत मालमत्ता करात १२ टक्के वाढीसह बिगर निवासी मालमत्ता करात २० टक्के, विकास प्रस्तावांतर्गत विकसित झालेल्या अधिकृत मालमत्तांच्या हस्तांतरणासाठी स्टॅम्प ड्युटी निश्चित करताना शासनाने ग्राह्य धरलेल्या बाजारमूल्याच्या ०.५ टक्के हस्तांतरण शुल्क आकारण्याचा प्रस्ताव देखील मंजुर झाला आहे.
शिवाय पार्किंगची शिस्त लावण्यासाठी महापालिकेने पाच प्रमुख रस्त्यांवर सहा महिन्यांचा प्रायोगिक पार्किंग प्रयोग राबविण्याचा प्रस्ताव तयार केला होता त्याला देखील महासभेने मंजुरी दिली आहे. ठाणेकरांवर तब्बल १० वर्षानंतर करवाढीचा बोजा पडणार आहे.
सोमवारी झालेल्या महासभेत मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर आला होता. यावेळी शिंदे सेनेचे नगरसेवक राम रेपाळे यांनी मालमत्ता करवाढीचे समर्थन करतांना ज्या मालमत्तांना अद्याप कर लावण्यात आलेला नाही, त्याला कर लावण्यासाठी काय काय प्रयत्न झाले याचा उहापोह केला.
प्रत्येक प्रभाग समिती अंतर्गत ज्या मालमत्तांना कर लावले गेले नाहीत, त्यांच्यासाठी कॅम्प लावण्यात यावेत, यासाठी वारंवार नगरसेवकांनी पाठपुरावा करुन देखील कर लावण्यात आला नसल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेचा महसुल वाढला तर विकास कामे करता येतील असेही त्यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे पुढील आठवड्यापासून यासाठी प्रयत्न झाले पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या व्यतिरिक्त इतर नगरसेवकांनी देखील या करवाढीला कोणत्याही स्वरुपाचा विरोध केला नाही. भाजपसह विरोधी बाकावर असलेल्या विरोधी पक्षनेते शाणु पठाण यांनी आपल्या पक्षातील नगरसेवक बोलण्याआधीच या प्रस्तावाला सुचनेसह मंजुरी दिली.
त्यामुळे इतर नगरसेवकांची त्यामुळे अडचण निर्माण झाली. अखेर मालमत्ता करवाढीसह मालमत्ता हस्तांतरण शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव मंजुर करण्यात आला.
प्रायोगिक तत्त्वावर पातलीपाडा जंक्शन ते रोडाज एनक्लेव्ह टीसीएस, निसर्ग तपोवन ते ऋतु इस्टेट, वाघबीळ जंक्शन ते भूमीएकर ब्रह्मांड फेज-८, ब्रह्मांड-पातलीपाडा लिंक रोड आणि मेपल ते फॉरेस्ट एव्हेन्यू या रस्त्यांवर पार्किंग धोरण राबविण्याचे प्रस्तावित करण्यात आले असून त्याला देखील महासभेने मंजुरी दिली आहे.
या रस्त्यांवर सुमारे १,८०० पार्किंग लॉट उभारण्याचे नियोजन आहे. त्यात दुचाकींसाठी ४६५, तीनचाकींसाठी १००, कारसाठी १,११५ आणि बस-ट्रकसारख्या अवजड वाहनांसाठी ८३ लॉट प्रस्तावित आहेत.
घर खरेदी-विक्रीही महागणार
मालमत्ता हस्तांतरण शुल्कात प्रस्तावित बदल अधिक गंभीर आहे. क्षेत्रफळावर आधारित शुल्काऐवजी शासनाच्या बाजारमूल्याच्या ०.५ टक्के शुल्क आकारण्याचा प्रस्ताव आहे. महागड्या मालमत्तांच्या व्यवहारात यामुळे थेट लाखो रुपयांचा अतिरिक्त भार येणार आहे. अनधिकृत मालमत्तांच्या हस्तांतरण शुल्कात तर तीनपट वाढ सुचविण्यात आली आहे. शुल्क १,५०० वरून ४,५००, ३,००० वरून ९,००० आणि ६,००० वरून १८,००० रुपये आता होणार आहे.
मालमत्ता करवाढ
मालमत्ता करात करवाढ सुचवितांना निवासी मालमत्तांच्या करात १२ टक्के, तर बिगर निवासी मालमत्तांच्या करात तब्बल २० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव मंजुर करण्यात आला आहे. यातून महापालिकेला सुमारे १०४.६७ कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल अपेक्षित धरण्यात आले आहे.
टीएमटी दरवाढ नाही
महासभेत टिएमटी भाडेवाढीचा प्रस्ताव देखील मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला होता. परंतु एमएमआर क्षेत्रातील भाडेवाढ ही एकसमान असावी त्या दृष्टीने शासनाकडून प्रस्ताव पुढे आला आहे. त्यामुळेच टीएमटी भाडेवाढीचा प्रस्ताव तुर्तास मागे घेण्यात आल्याचे प्रशासनाने यावेळी स्पष्ट केले.