Mahad Industrial Safety: महाडमध्ये कामगार सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

इंडो अमाईन्स वायू गळतीनंतर अपघाताच्यासंदर्भात उत्पादक संघटनेची भूमिका महत्त्वाची
Mahad MIDC Gas Leak
Mahad MIDC Gas LeakPudhari
Published on
Updated on

श्रीकृष्ण बाळ

महाड: इंडो अमाईन्सच्या शनिवारी रात्रीच्या वायू गळती घटने पश्चात महाड औद्योगिक वसाहतीमध्ये घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मागील काही वर्षातील मोठ्या झालेल्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाड उत्पादक संघटनेला या अपघातांबाबत पुढाकार घेऊन मार्ग काढावा लागेल असे स्पष्ट मत परिसरातील नागरिक व कामगार वर्गातून व्यक्त होत आहे.

Mahad MIDC Gas Leak
Mahad Indo Amines Gas Leak: महाड वायुगळतीप्रकरणी एमपीसीबीच्या भूमिकेकडे लक्ष; परिसरातील झाडे भरपावसातही झाली पिवळी

औद्योगिक क्षेत्रात उत्पादन प्रक्रिया सुरळीत सुरू असताना कामगारांच्या जीविताची आणि आरोग्याची सुरक्षितता ही सर्वाधिक महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे अशा अपघातांनंतर केवळ संबंधित कंपनीवर जबाबदारी निश्चित करण्यापेक्षा संपूर्ण औद्योगिक क्षेत्रात सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा आढावा घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

महाड औद्योगिक वसाहत ही रायगड जिल्ह्यातील महत्त्वाची औद्योगिक केंद्रे मानली जाते. विविध प्रकारचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या येथे कार्यरत असून मोठ्या संख्येने कामगार, कंत्राटी कर्मचारी आणि विविध सेवा पुरवणारे कर्मचारी या परिसरात कार्यरत असतात. उत्पादन प्रक्रियेत रसायने, यंत्रसामग्री, ज्वलनशील पदार्थ तसेच विविध तांत्रिक उपकरणांचा वापर होत असल्याने सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे.

अलीकडील अपघाताच्या पार्श्वभूमीवर उत्पादक संघटनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. महाड औद्योगिक क्षेत्रातील सर्व कंपन्यांनी सुरक्षा नियमांचे पालन करावे, यासाठी संघटनेने पुढाकार घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अपघातग्रस्त कंपनीला आवश्यक ते सहकार्य करण्याबरोबरच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सामूहिक सुरक्षा धोरण आखणे, नियमित सुरक्षा तपासणी करणे आणि कामगारांना प्रशिक्षण देणे या बाबींवर भर देणे आवश्यक आहे.

कामगारांना यंत्रसामग्री हाताळण्याचे योग्य प्रशिक्षण, आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांची माहिती आणि आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून देणे ही संबंधित उद्योगांची प्राथमिक जबाबदारी आहे.

त्याचबरोबर कंत्राटी कामगारांनाही कायमस्वरूपी कामगारांप्रमाणेच सुरक्षा प्रशिक्षण आणि संरक्षण मिळणे गरजेचे आहे. केवळ कागदोपत्री सुरक्षा नियम न ठेवता त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत आहे की नाही, याची नियमित पाहणी होणे आवश्यक आहे.

अपघातानंतर प्रशासनाकडून चौकशी केली जाते; मात्र चौकशीचा उद्देश केवळ दोष निश्चित करणे एवढाच न राहता भविष्यातील दुर्घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना निश्चित करणे आवश्यक आहे. उत्पादक संघटनेने प्रशासन, कंपनी व्यवस्थापन, कामगार प्रतिनिधी आणि सुरक्षा तज्ज्ञ यांच्यात समन्वय साधल्यास औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

Mahad MIDC Gas Leak
Mahad Toxic Gas Leak: मृत अल्पेश वांद्रे कुटुंबीयांना ५० लाखांची मदत तर पत्नीला महिना ११ हजाराची पेन्शन

महाड औद्योगिक वसाहतीची प्रतिमा सुरक्षित आणि जबाबदार औद्योगिक क्षेत्र म्हणून कायम ठेवण्यासाठी सर्व घटकांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. उत्पादन वाढीसोबत कामगारांची सुरक्षितता, पर्यावरणाचे संरक्षण आणि आपत्कालीन व्यवस्थापन यांनाही समान महत्त्व देणे आवश्यक आहे.

त्यामुळे सध्याच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर उत्पादक संघटना कोणती भूमिका घेते आणि भविष्यातील अपघात टाळण्यासाठी कोणत्या ठोस उपाययोजना करते, याकडे कामगारांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news