

Former Mayor Meenakshi Shinde Investigation
ठाणे : शिवसेना ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात अखेर माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांना एसआयटी पथकाने चौकशीसाठी बोलावले आहे. मंगळवारी सकाळी मीनाक्षी शिंदे ठाणे खंडणी विरोधी पथकाच्या कार्यालयात हजर झाल्या आहेत.
तर दुसरीकडे सुत्रधाराला अटक करा या मागणीसाठी प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या घरासमोर आंदोलन करण्यास गेले असता त्यांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. यावेळी उबठा पक्षाचे नेते राजन विचार, केदार दिघे, मनसेचे नेते अविनाश जाधव हे देखील नौपाडा पोलीस ठाण्यात पोहचले. यावेळी पूर्णेकर कुटुंबीयांनी पोलिसांवर गंभीर आरोप करीत राजकीय दबावामुळे सुत्रधाराचा पोलीस बचाव करीत आहेत, असा आरोप केला. सुत्रधाराला अटक होत नाही तो पर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा पवित्रा पूर्णेकर कुटुंबीय व त्यांच्या समर्थनार्थ आलेल्या नेत्यांनी पोलीस ठाण्यात घेतला.
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांना सर्व पुरावे देऊन देखील मुख्य सुत्रधारास अटक का होत नाही असा सवाल करीत पूर्णेकर कुटुंबीयांनी या घटनेचा तपास करीत असलेल्या पोलिसांच्या एसआयटीवर गंभीर आरोप केले. गुन्ह्यात पकडलेला पाचवा आरोपी खोटा आहे असे बोललो असता एसआयटी पथकातील पोलीस अधिकारी शैलेश साळवी यांनी आरोपी खोटा आहे असे मीडियात बोलू नकोस नाहीतर तुमची केस कोर्टात चालणार नाही असे मला धमकवल्याचा आरोप राम पूर्णेकर यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात केला. तर मंत्री प्रताप सरनाईक आमच्या भेटीस आले होते तेव्हा त्यांनी देखील मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी करू नका, आम्ही तुम्हाला वकील देतो, ज्याची 17 लाख रुपये आहे व ती आम्ही देऊ असे वारंवार सांगितले होते असा खळबळजनक आरोप दिवंगत प्रदीप पूर्णेकर यांच्या पत्नीने नौपाडा पोलीस ठाण्यात केला.
गुन्ह्यात पकडण्यात आलेला पाचवा आरोपी अमित सिंग हा डमी आरोपी असून त्यास युपीतल्या कुख्यात सुभाष सिंग ठाकूर गॅंगने बळजबरीने प्रयागराज पोलीसांसमोर हजर करवून घेतले असा आरोप देखील यावेळी उपस्थित उबठा पक्षाच्या नेत्यांनी केला. एसआयटी फक्त चौकशीचे ढोंग करीत असून या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधारांना वाचवण्यासाठी हे सारे नाट्य सुरू असल्याचा गंभीर आरोप पूर्णेकर कुटुंबीयांनी केला आहे.