

Thane Police Investigation Probe
ठाणे : राज्यभर चर्चेत असलेल्या ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या तपासावरून पूर्णेकर कुटुंबीयांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. हत्येमागील सूत्रधाराला अटक करण्याच्या मागणीसाठी कुटुंबीय आणि समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणात राजेंद्र शिंदे आणि मीनाक्षी शिंदे यांना अटक करावी, या मागणीसाठी मंगळवारी नौपाडा, घोडबंदर रोड आणि भिवंडी येथे पूर्णेकर समर्थकांनी रास्ता रोको आंदोलन केले.
या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी बुधवारी (दि.२८) दुपारी १२ वाजता तातडीची पत्रकार परिषद आयोजित केली होती. हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, त्यामागील हेतू काय होता आणि या गुन्ह्याचा सूत्रधार कोण आहे, याबाबत पोलीस महत्त्वाची माहिती देतील, अशी अपेक्षा पत्रकारांना होती. मात्र, पोलिसांनी पाच आरोपींना अटक केल्याची, हत्येसाठी वापरलेले शस्त्र आणि वाहन जप्त केल्याची तसेच साक्षीदारांचे जबाब नोंदविल्याची माहिती देऊन पत्रकार परिषद आटोपती घेतली.
प्रदीप पूर्णेकर यांची हत्या नेमक्या कोणत्या कारणामुळे झाली? या गुन्ह्यामागील खरा सूत्रधार कोण आहे? असे थेट प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केले. मात्र, या प्रश्नांना सविस्तर उत्तरे देण्याऐवजी तपास सुरू असल्याचे सांगत पोलीस अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला.
त्यामुळे अटकेत असलेल्या आरोपींच्या चौकशीतून नेमकी कोणती माहिती समोर आली, हत्येमागे कोणता वाद किंवा हेतू होता आणि तपासाची पुढील दिशा काय आहे, याबाबत स्पष्टता मिळू शकली नाही.
एकीकडे पूर्णेकर कुटुंबीयांकडून सूत्रधाराच्या अटकेची मागणी जोर धरत असताना, दुसरीकडे पोलिसांनी तपासाबाबत अधिक माहिती देण्याचे टाळल्याने या प्रकरणातील अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. त्यामुळे प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचे गूढ अद्याप कायम आहे.