Thane News : यूपीतील ड्रग्ज फॅक्टरीचा ठाणे पोलिसांनी केला पर्दाफाश; २७ कोटींचे ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त

Thane News : यूपीतील ड्रग्ज फॅक्टरीचा ठाणे पोलिसांनी केला पर्दाफाश; २७ कोटींचे ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त

ठाणे : पुढारी वृत्तसेवा:  उत्तर प्रदेशातील एमडी ड्रग्ज फॅक्टरीचा ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी यूपीतल्या वाराणसी जिल्ह्यातून दोघा आरोपींना ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींच्या ताब्यातून तयार एमडी पावडर, ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारे केमिकल आणि इतर साहित्य असे एकूण 27 कोटी 87 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली. Thane News

ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठाणे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने 24 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2024 या कालावधीत आफताफ अजीज मलाडा (वय 22, नालासोपारा, वसई, जिल्हा पालघर), जयनाथ चंद्रबली यादव उर्फ कांचा (वय 27, नालासोपारा), शेरबहाद्दूर राधेश्याम सिंग उर्फ अंकित (वय 23, नालासोपारा) आणि हुसेन सलीम सैय्यद ( वय 48, नालासोपारा) या चौघांना अटक करून त्यांच्या ताब्यातून 14 लाख रुपये किमतीचे 481 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले होते. दरम्यान, अटकेतल्या चौघा आरोपींनी हे ड्रग्ज कोठून आणले, याचा तपास केला असता त्यांनी हे ड्रग्ज यूपीतून आणल्याचे समोर आले. त्यानंतर ठाणे गुन्हे शाखा युनिट एकचे एक पथक उत्तर प्रदेशात रवाना झाले होते. Thane News

पथकाने यूपीतल्या भगवतीपूर या छोट्याशा गावात तब्बल दीड महिना वेषांतर करून ड्रग्ज फॅक्टरीचा शोध घेतला. फॅक्टरीची माहिती हाती लागताच ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने 16 मार्च 2024 रोजी यूपी स्पेशल टास्क फोर्सच्या मदतीने सदर ड्रग्ज फॅक्टरीवर छापा टाकला. यावेळी अतुल अशोककुमार सिंह (36, पूआरी खुर्द, जिल्हा वाराणसी, उत्तर प्रदेश) आणि संतोष हडबडी गुप्ता (38, तिवारीपूर खुर्द, जिल्हा वाराणसी, उत्तर प्रदेश) या दोघांना एमडी ड्रग्ज बनवत असतांना पोलिसांनी रंगेहात पकडले. तर घरातच थाटलेल्या ड्रग्ज फॅक्टरीतून एमडी बनवण्यासाठी लागणारे केमिकल, इतर साहित्य, एक कार आणि 2 कोटी 64 लाखाचे तयार एमडी असे एकूण 27 कोटी 87 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात ठाणे पोलिसांना यश आले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news