बोरीवली-ठाणे बोगदा म्हणजे पैसे खाण्याचे कुरण : जितेंद्र आव्हाड | पुढारी

बोरीवली-ठाणे बोगदा म्हणजे पैसे खाण्याचे कुरण : जितेंद्र आव्हाड

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचा बोरीवली-ठाणे बोगद्याचा प्रकल्प म्हणजे निवडणूक भ्रष्टाचाराचे मोठे उदाहरण आहे. या प्रकल्पाचे १४ हजार ४०० कोटी रुपयांचे कंत्राट मेघा इंजिनिअरिंग या कंपनीला देण्यात आले असून याच कंपनीने ९४० कोटी रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजे १४ हजार कोटी रुपयांचे कंत्राट मिळवा आणि ९४० कोटी रुपयांचे निवडणूक रोखे विकत घ्या, असा हा कारभार आहे. हा रस्ता म्हणजे पैसे खाण्याचे कुरण असून रोख्यांच्या बदल्यात ठेका असा प्रकार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने निवडणूक रोख्यांचा तपशील गुरुवारी (दि.१४) आपल्या संकेतस्थळावर जाहीर केला. यात निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांना हजारो कोटी रुपये दान करणाऱ्या दानशूर कंपन्यांची नावे पुढे आली आहेत. यापैकी मेघा इंजिनिअरींग या कंपनीने ९४० कोटी रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे. याच कंपनीला बोरीवली ते ठाणे या दुहेरी बोगद्यांचे सुमारे १४ हजार ४०० कोटी रुपयांचे कंत्राट एमएमआरडीएने नुकतेच बहाल केल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. हा प्रकल्प कुणाचा महत्वकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जातो असा सवाल करत आव्हाड यांनी या प्रकरणी मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे.

बोरीवली ते ठाणे रस्त्याची जर चौकशी केली तर किलोमीटर मागे लावलेली किंमत आणि खरी किंमत यांच्यात प्रचंड तफावत आहे, हे स्पष्ट होईल. हे सर्व करण्यासाठी मेेघा इंजिनिअरींग या कंपनीने ९४० कोटी रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केले. ही खरेदी कोणत्या पक्षासाठी केली, याचा अभ्यास केला तर हा प्रकार म्हणजे रोख्यांच्या बदल्यात ठेका असा प्रकार असल्याचे लक्षात येईल. प्रकल्पाची एकूण किंमत आहे त्याच्या दहा टक्के म्हणजे ९४० कोटी रुपयांचे रोखे या कंपनीने विकत घेतले. या रस्त्याच्या कामाची चौकशी व्हायला हवी. हा रस्ता म्हणजे पैसे खाण्याचे कुरण आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला. मोठे ठेके मिळवायचे असतील तर असे निवडणूक रोखे विकत घ्या, असा हा सरळसाधा मार्ग आहे. हे सरळ गणित केंद्र आणि राज्य सरकारने मांडले आहे हे स्पष्टच दिसते, असा आरोपही त्यांनी केला. या रस्त्याची एका किलोमीटरच्या कामाची किंमत ही यापुर्वी कधीच दिली गेली नसेल इतकी आहे. जणू काही सोन्याचा मुलामाच या रस्त्याला लावणार आहेत, असा टोलाही आव्हाड यांनी राज्य सरकारला लगावला.

हेही वाचा : 

Back to top button