ठाणे : दादोजी कोंडदेव स्टेडियमबाहेर क्रिकेटप्रेमींचा गदारोळ; पोलिसांचा लाठीचार्ज | पुढारी

ठाणे : दादोजी कोंडदेव स्टेडियमबाहेर क्रिकेटप्रेमींचा गदारोळ; पोलिसांचा लाठीचार्ज

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या आयएसपीएल क्रिकेट सामन्यादरम्यान क्रिकेटप्रेमींनी स्टेडियमबाहेर मोठा गदारोळ घातला. सुरक्षा रक्षकांना न जुमानता क्रिकेटप्रेमी प्रवेशद्वारावरून उड्या टाकत स्टेडियममध्ये शिरले. यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.

ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे टेनिस व क्रिकेट स्पर्धेचे ६ मार्च ते १५ मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा अंतिम सामना शुक्रवारी मुंबई व कोलकत्ता या संघांविरुद्ध रंगला. या सामन्यासाठी क्रिकेटर सचिन तेंडुलकरसह बिग बी अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, सेफ अली खान या सिनेकलाकारांनी हजेरी लावली. शुक्रवारी (दि.१५) अंतिम सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर प्रचंड अभूतपूर्व गर्दी झाली. तर मॅच आणि सिनेकलाकारांना बघण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी स्टेडियमच्या बाहेरही प्रचंड गर्दी केली. सामन्याचे पासेस असूनही सुरक्षा रक्षकांनी प्रवेश न दिल्याने प्रेक्षकांनी सुरक्षा रक्षकांना न जुमानता गेट क्र. ३ वरून स्टेडियममध्ये उड्या टाकल्या. स्टेडियममध्ये बसण्यासाठी जागा नाही. त्यामुळे इथून गर्दी कमी करावी, अशा सूचना पोलिसांनी लाऊड स्पीकरद्वारे वारंवार दिल्या, मात्र जमलेल्या गर्दीने बेरिगेट तोडून गोंधळ घातल्याने पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.

यादरम्यान दादोजी कोंडदेव स्टेडियम बाहेरील रस्ता, ठाणे बाजारपेठ, स्टेशन परिसर, जांभळी नाका, तलाव पाळी परिसर, कोर्ट नाका येथे मोठी वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामध्ये ठाणे बाजारपेठेत एक रुग्णवाहिका अडकली. त्यानंतर पोलिसांनी वाहतूक नियंत्रण करीत रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली.

हेही वाचा :

Back to top button