

ठाणे : प्रवीण सोनावणे
दमदार सुरु असलेल्या पावसामुळे ठाण्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष कोसळून वाहनांचे आणि घरांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत यामध्ये दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून शहरातील झाडांच्या फांद्या वेळेत आणि शास्त्रोक्त पद्धतीने छाटल्या गेल्या नसल्यानेच धोकादायक वृक्षांचा धोका अजूनही कायम आहे.
पालिकेच्याच सर्व्हेक्षणानुसार,शहरात अद्याप ३ हजारांपेक्षा अधिक फांद्यांची छाटणी शिल्लक असून यामुळे धोकादायक झाडे कधीही कोसळण्याचा धोका वाढला आहे.ज्या ठेकेदाराला हे छाटणीचे काम देण्यात आले त्या संबंधित ठेकेराकडून छाटणीचे काम वेळेत का झाले नाही? भर पावसात फांद्या कशा छाटणार असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.
यावर्षी देखील पावसाच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाल्याचे समोर आले आहे. मात्र गांभीर्याची बाब म्हणजे शहरात अजूनही तब्बल तीन हजारांपेक्षा अधिक झाडांच्या फांद्या छाटणी शिल्लक असून भर पावसात आता या फांद्या छाटण्याचे आव्हान पालिका प्रशासना समोर आहे. या फांद्या वेळेत छाटल्या गेल्या नाहीत तर झाडे पडण्याच्या धोका देखील कायम असल्याचे मत पर्यावरण तज्ञांनी व्यक्त केले आहे.
२४ तासांत ११० झाडे कोसळली
पाऊस २० ते २५ दिवसांनी उशिरा सुरु झाला असला तरी, त्यानंतर जोर धरलेल्या पावसाने रौद्र रूप धारण केले. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ठाण्यात ८ दिवसांमध्ये शेकडो झाडे कोसळली आहे. तर गेल्या २४ तासांत ११० झाले कोसळली आहेत. यामध्ये अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वेळेत झाडांच्या फांद्याची छाटणी न झाल्याने हे सर्व प्रकार घडले असल्याचे कारण समोर आले आहे.
काँक्रीटीकरण व अशास्त्रीय छाटणी वृक्षांच्या मुळावर
ठाण्यात विकासाच्या नावाखाली गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात काँक्रीटीकरण झाले असून यासाठी हजारो वृक्षांवर घाला घालण्यात आला आहे. अनेक झाडांना तर विशिष्ट प्रकारचे इंजेक्शन देऊनही मारण्यात आले असल्याचे प्रकार देखील यापूर्वी उघड झाले आहेत. दुसरीकडे ज्या ठेकेदारांना झाडांच्या फांद्याची छाटणीचे काम देण्यात आले आहेत त्यांच्याकडून या फांद्याची अशास्त्रीय पद्धतीने छाटणी होत असल्याने झाडांचा धोका कमी होण्याच्या ऐवजी वाढला आहे. परिणामी झाडे कोसळण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.