Nashik Heavy Rain | रस्त्यांची ऐशीतैशी; नाशिककरांची फजिती

Nashik Heavy Rain | खड्डे पाण्याने तुडुंब : जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास
Nashik Heavy Rain | रस्त्यांची ऐशीतैशी; नाशिककरांची फजिती
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आगामी सिंहस्थ पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांमुळे नाशिककरांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. ठिकठिकाणी खोदलेले रस्ते, कामांची संथ गती आणि त्यातच शनिवारी (दि.४) झालेल्या जोरदार पावसाने शहरातील अनेक रस्त्यांची अक्षरशः ऐशीतैशी झाली. मुख्य रस्त्यांपासून ते उपनगरांतील अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे, चिखल आणि साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

Nashik Heavy Rain | रस्त्यांची ऐशीतैशी; नाशिककरांची फजिती
Sindhudurg News| इंधन दरवाढीने महागाईचा भडका

सिंहस्थाशी संबंधित पाणीपुरवठा, मलनिस्सारण, विद्युत, गॅस पाइपलाइन आणि इतर पायाभूत सुविधांच्या कामांसाठी अनेक रस्ते खोदण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी कामे अपूर्ण अवस्थेत असून खड्डे तसेच पडून आहेत. शनिवारी पावसामुळे हे खड्डे पूर्णपणे पाण्याखाली गेले असून, त्यांचा अंदाज न आल्याने एखाद्याच्या जीवावरदेखील बेतू शकेल, अशी परिस्थिती आहे.

खोदकामातून निघालेला राडारोडा रस्त्याच्या कडेलाच टाकून ठेवल्याने, रस्त्यावर पसरला आहे. त्यामुळे रस्ते चिखलमय आणि निसरडे झाले आहेत. दुचाकीस्वारांना विशेषतः मोठा धोका निर्माण झाला असून, अनेक ठिकाणी वाहने घसरल्याच्या घटना घडल्या आहेत. पादचाऱ्यांनाही चिखलातून वाट काढताना कसरत करावी लागत आहे.

द्वारका, इंदिरानगर, गंगापूर रोड, कॉलेजरोड, अंबड, सातपूर, म्हसरूळ, सिडको, पंचवटी, जेलरोड, नाशिकरोडसह अनेक भागांत रस्त्यांची अवस्था बिकट आहे. मुख्य चौकांमध्येही पाणी साचल्याने वाहतूक संथ झाली असून, कोंडी निर्माण होत आहे.

काम सुरू करण्यापूर्वी पर्यायी वाहतूक व्यवस्था, बॅरिकेडिंग किंवा पावसाळ्यापूर्वी तात्पुरती डागडुजी करण्याकडे संबंधित यंत्रणांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे प्रत्येक पावसानंतर रस्त्यांची दुरवस्था अधिकच गंभीर होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी पाण्याखाली लपलेले खड्डे वाहनचालकांसाठी 'मृत्यूचे सापळे' ठरत असल्याची भावना नाशिककरांकडून व्यक्त होत आहे.

रुग्णवाहिका, शालेय वाहतुकीची कसरत

रस्त्यांवरील चिखल आणि कोंडीमुळे रुग्णवाहिकांसह शालेय वाहतूकदारांची कसरत बघावयास मिळत आहे. बहुतांश शाळांची वेळ सकाळी ७ ची असून, ६ पासूनच शालेय वाहतूक सुरू होते. खड्डेमय रस्त्यांवरून अपुऱ्या प्रकाशात वाहने चालविणे धोकादायक बनले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

Nashik Heavy Rain | रस्त्यांची ऐशीतैशी; नाशिककरांची फजिती
Thanale- Nadsur Caves | वनौषधीच्या परिसरात ठाणाळे- नाडसूर लेणी

गुलमोहराचे झाड कोसळले

जेहान सर्कललगत असलेल्या एका उडपी हॉटेलसमोरील गुलमोहराचे मोठे झाड उन्मळून पडले. यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, बराच वेळ या भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती. उपमहापौर विलास शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत, तत्काळ झाड घटनास्थळावरून हटविण्यात आले. याशिवाय शहरातील इतरही भागात झाडे पडल्याची माहिती समोर येत आहे.

आरटीओकडे जाणारा रस्ताच चिखलात

तांबे-बोराडे मळा येथील श्रीमंगल ड्रायव्हिंग स्कूलपासून आरटीओकडे जाणारा रस्ताच चिखलात हरवला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे असून, ते पाण्याने तुडुंब भरल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news