

खानिवडे : वसई पूर्वेतील शिरसाड–वज्रेश्वरी या महत्त्वाच्या मार्गावर पहिल्याच जोरदार पावसात रस्त्यालगतची अनेक जुनी अजस्त्र झाडे उन्मळून पडल्याने मंगळवारी रात्री अनेक तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. विशेष म्हणजे, या मार्गावरील झाडांच्या मुळांजवळ गॅस वहिनी, जलवाहिनी, भूमिगत वीजवाहिनी आदी विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम झाल्याने झाडे कमकुवत झाली होती. त्यामुळे पावसाळ्यात ती कोसळण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी यापूर्वीच दिला होता. तो अखेर खरा ठरला आहे.
मांडवी व घाटेघर परिसरात कोसळलेल्या वृक्षांमुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला. मांडवी पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्रीच युद्धपातळीवर मदतकार्य करून झाडे हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. मात्र, या काळात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. सुदैवाने झाडे रात्री कोसळल्याने आणि त्यावेळी कोणतेही वाहन थेट झाडाखाली नसल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, याच मार्गावर यापूर्वी झाडांच्या फांद्या कोसळून झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वार व त्याच्या पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे नागरिकांनी व्यक्त केलेली भीती पुन्हा एकदा खरी ठरल्याची भावना व्यक्त होत आहे.
एकाच रस्त्यावरून दुहेरी वाहतूक सुरू असलेल्या या रस्त्याचे मागील वर्षभरा पासून काँक्रीटीकरण अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने वाहतूक कोंडी हा रोजचाच विषय बनला आहे. त्यात आता उन्मळणाऱ्या झाडांमुळे प्रवास आणखी धोकादायक बनला असून वाहनचालक, विद्यार्थी, कामगार आणि रुग्णवाहिकांनाही मोठा फटका बसत आहे.
शिरसाड–वज्रेश्वरी मार्ग हा शेकडो गावे, पाडे आणि वस्त्यांसाठी जीवनवाहिनी मानला जातो. वसई, विरार आणि मुंबईकडे शिक्षण, नोकरी, उद्योगधंदे तसेच उपचारांसाठी जाणारे हजारो नागरिक याच मार्गाचा वापर करतात. याशिवाय शेतीप्रधान भागातील शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारात पोहोचविण्यासाठीही हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे रस्त्यावरील रखडलेली कामे, धोकादायक झालेली झाडे आणि वारंवार होणारी वाहतूक कोंडी यावर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
इशाऱ्याकडे दुर्लक्ष ; आता प्रशासन जागे होणार?
झाडांच्या मुळांजवळ मोठ्या प्रमाणात खोदकाम झाल्याने ती पावसात कोसळू शकतात, असा इशारा स्थानिकांनी यापूर्वीच दिला होता. मात्र, त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. पहिल्याच मुसळधार पावसात झाडे कोसळल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.