

राजेश जागरे
शहापूर : तालुक्यातील डोळखांब वनपरिक्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून नरभक्षक बिबट्याने दहशत निर्माण केली होती. दरम्यान लाद्याची वाडी येथील आठ वर्षीय कृष्णा आगीवाले या निष्पाप मुलाचा बळी घेणारा नरभक्षक बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. या कारवाईमुळे परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला असून अनेक दिवसांपासून निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
सदर बिबट्याने डोळखांब परिसरातील अनेक गावांमध्ये वारंवार दर्शन देत नागरिकांमध्ये भीती निर्माण केली होती. विशेषतः लहान मुले, महिला आणि शेतकरी वर्गामध्ये मोठी दहशत पसरली होती. काही दिवसांपूर्वी लाद्याची वाडी येथील जंगलात रानमेवा गोळा करण्यासाठी गेलेल्या कृष्णा आगीवाले या आठ वर्षीय मुलावर बिबट्याने अचानक हल्ला करून त्याला ठार केले होते. या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली होती.
घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली होती. तसेच ग्रामस्थ,विविध सामाजिक संघटना आणि श्रमजीवी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. नागरिकांच्या वाढत्या दबावानंतर वनविभागाने विशेष पथके तयार करून परिसरात पिंजरे, ट्रॅप कॅमेरे आणि रात्री गस्त वाढवली होती. अखेर सलग अनेक दिवसांच्या शोधमोहीमेनंतर संबंधित नरभक्षक बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला. बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती समोर येताच ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. मात्र या घटनेत निष्पाप कृष्णाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
वनविभागाकडून पकडण्यात आलेल्या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून पुढील निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकटे बाहेर न पडणे, लहान मुलांवर लक्ष ठेवणे आणि वनक्षेत्रालगत सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.