Bhandara Leopard Attack : धावत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला, युवक गंभीर जखमी; राजापूर येथील घटना

गावकऱ्यांच्या धाडसामुळे वाचले प्राण
leopard attack
pudhari photo
Published on
Updated on

भंडारा : महाराष्ट्र-मध्यप्रदेश राज्याला जोडणाऱ्या आंतरराज्य मार्गावर बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच असून, मंगळवारी सकाळी एका महाविद्यालयीन तरुणावर बिबट्याने भीषण हल्ला चढवला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून ही घटना राजापूर तलावाजवळ घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या या थरारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

परीक्षेला जाताना ओढवला प्रसंग

मध्यप्रदेशातील वारशिवनी तालुक्यातील उमरवाडा येथील रहिवासी अतुल सुरेंद्र टेंभुर्णे (वय २३ वर्षे) हा तरुण मंगळवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आपल्या एम.पी. ५० एम.एन. ४३१९ क्रमांकाच्या मोटारसायकलने सीतासावंगी येथील तंत्र निकेतन महाविद्यालयाकडे जात होता. अतुलची पर्यावरण विषयाची अंतिम वर्षाची परीक्षा असल्याने तो वेळेत पोहोचण्यासाठी निघाला होता. मात्र, राजापूर तलावाजवळ येताच रस्त्याशेजारील घनदाट झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप घातली.

गावकऱ्यांच्या धाडसामुळे वाचले प्राण

बिबट्याच्या अनपेक्षित हल्ल्यामुळे अतुलचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि तो रस्त्यावर जोराने कोसळला. बिबट्याने त्याला जबड्यात पकडण्याचा प्रयत्न केला असता अतुलने जीवाच्या आकांताने आक्रोश केला. सुदैवाने, जवळच असलेल्या गावकऱ्यांच्या कानी हा आवाज पडताच त्यांनी लाठ्या-काठ्यांसह घटनास्थळाकडे धाव घेतली. गावकऱ्यांचा वाढता गराडा आणि गोंगाट पाहून बिबट्याने जखमी अतुलला सोडून जंगलाच्या दिशेने पळ काढला. ग्रामस्थांनी तातडीने रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या अतुलला नाकाडोंगरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.

या घटनेची माहिती मिळताच नाकाडोंगरी वन परिक्षेत्र कार्यालयाचे क्षेत्र सहाय्यक यादव यांनी घटनास्थळी भेट दिली. ‘तलावाच्या परिसरात बिबट्या पाणी पिण्यासाठी येत असावा आणि त्याच वेळी तरुण समोर आल्याने बिबट्याने हल्ला केला असावा,’ असा प्राथमिक अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

मात्र, या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये वन विभागाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. चिखला, राजापूर, सीतासावंगी आणि परिसरातील गावांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून वाघ व बिबट्यांचा मुक्त वावर असून अनेकदा पाळीव प्राण्यांवरही हल्ले झाले आहेत. हिंस्र श्वापदांचा वावर वाढलेला असतानाही वन विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. ‘जोपर्यंत एखाद्याचा जीव जात नाही, तोपर्यंत प्रशासन जागे होणार नाही का?’ असा संतप्त सवाल आता ग्रामस्थ विचारत आहेत. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news