

शाम धुमाळ / राजेश जागरे
कसारा: डोळखांब वनपरिक्षेत्र हद्दीतील कळभोंडे लाद्याची वाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लाद्याची वाडी येथील कृष्णा भागा आगीवले असे मृत बालकाचे नाव आहे.
मंगळवारी सकाळी साधारण 9 ते 10 वाजण्याच्या सुमारास गावाशेजारीच दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
परिणामी या प्रकरणामुळे वनमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांना वनअधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवल्याचे बोलले जात आहे. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत वन विभागाच्या स्थानिक पातळीवरील यंत्रणा म्हणून कार्यरत असलेले संबंधित विभागाचे अधिकारी यांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
कसाराजवळील कळभोंडे लाद्याची वाडी येथे हा मुलगा रानमेवा गोळा करण्यासाठी गेला होता. मात्र बिबट्याने त्याच्यावर केलेल्या हल्ल्यामुळे या आठ वर्षीय बालकाला आपले प्राण गमवावे लागले. दुर्दैवीपणे त्याचा मृत्यू झाला.
मंगळवारी सकाळच्या सुमारास कृष्णा आगीवले हा रानमेवा गोळा करण्यासाठी जंगलात गेला होता. झाडावरील आंबे वा करवंदे गोळा करीत असताना जंगलात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक कृष्णावर झडप घातली.
या झटापटीमध्ये फरपटत नेलेल्या कृष्णाचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी या प्रकरणामुळे वनमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांना वनअधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान बिबट्याच्या या वाढत्या हल्ल्यांंमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत संबंधित विभागाच्या या कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नागरिकांचे संरक्षण, सतर्क गस्त व योग्य उपाययोजना करण्यात झालेल्या कथित दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा स्थानिक स्तरावर उमटत आहे.
याबाबत सविस्तर वृत्ती असे की, कृष्णा आगीवले हा बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन जागीच मृत झाल्याची माहिती स्थानिक गावकऱ्यांना मिळताच गावाकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी गर्दी केली. भर दिवसा असणारा बिबट्याचा वावर आणि बिबट्याच्या हल्ल्यांमुळे परिसरात घबराट पसरली आहे. याबाबत संबंधित विभागावर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान परिसरात बिबट्याचा वावर अनेक दिवसांपासून दिसून येत असल्याची माहिती स्थानिकांनी विभागाला देण्यात आली होती. मात्र कोणतीही ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना न झाल्याने अखेर एका निष्पाप बालकाचा बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी तत्काळ बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावावेत, परिसरात गस्त वाढवावी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे आगीवले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
वनमंत्र्यांनी दिले होते निर्देश
ज्या भागात बिबट्यांचे दर्शन होत आहे किंवा हल्ले झाले आहेत, त्या भागात वनविभागाने गस्त वाढवावी व सतत लक्ष ठेवावे, कृत्रिम बुद्धिमत्ता व तंत्रज्ञानाचा वापर करून बिबट्यांची हालचाल ओळखण्यासाठी कॅमेरे, सेन्सर व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने निगराणी ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना म्हणून बिबट्यांना जंगलात किंवा सुरक्षित भागात अन्न उपलब्ध करून देणे.
यामध्ये कोंबड्या व शेळ्या अशा उपाययोजनांचा विचार करण्यास सांगितले होते. गरज पडल्यास नियंत्रणात्मक उपाय म्हणून बिबट्यांची संख्या जास्त असल्यास त्यांची नसबंदी हा शेवटचा पर्याय म्हणून वापरण्याचा विचार करण्याचेही निर्देश दिले होते.
दरम्यान नागरिकांची सुरक्षा तसेच हल्ल्यातील जखमी नागरिकांना तत्काळ आर्थिक मदत देणे व लोकांना सावध राहण्याचे आवाहन करणे आदी सूचना वनमंत्री गणेश नाईक यांनी वनविभागाला दिल्या होत्या, मात्र सूचनांचे पालन होत नसल्याचा आरोप श्रमजीवीचे प्रकाश खोडका यांनी केला आहे.
आई पोटासाठी कामाला अन्...
बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या कृष्णाला वडील नाहीत. त्यामुळे घरची जबाबदारी कृष्णाच्या आईवर आहे. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कृष्णाची आई गुलाबीबाई आळेफाटा येथे कांदे काढायच्या कामासाठी रोजंदारीवर कामाला गेल्या होत्या. तीन मुलांना घरालगत नातेवाईकांकडे ठेवून कामाला गेलेल्या माऊलीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान 12 वाजेपर्यंत मृतदेह उन्हात पडून होता.
परिसरात बिबट्याचा वावर अनेक दिवसांपासून दिसत होता. होती. मात्र कोणतीही ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना न झाल्याने अखेर एका निष्पाप बालकाचा बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजनेच्या सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
घटनेनंतर ग्रामस्थांनी तत्काळ बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावावेत, परिसरात गस्त वाढवावी तसेच सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. यामुळे आगीवले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून हळहळ व्यक्त होत आहे.