

Thane- Nashik Traffic
शहापूर : राजेश जागरे
ठाणे-नाशिक महामार्गावर दररोज वाढणारी वाहतूककोंडी आता केवळ वेळ आणि संयम नव्हे तर अक्षरशः कोट्यवधी रुपयांचे इंधन गिळंकृत करत आहे. तीस मिनिटांचा प्रवास तीन तासांचा झाला आहे. अभियांत्रिकी प्रशिक्षक राजेंद्र उत्तूरकर यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले की, एका वर्षांत या महामार्गावरील कोंडीमुळे जवळपास 5 हजार 200 कोटींचे इंधन वाया गेले आहे.
ठाणे-नाशिक महामार्गावर ठाणे, भिवंडी, शहापूर, कसारामार्गे नाशिकपर्यंत जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. औद्योगिक वाहने, प्रवासी एस.टी. बस तसेच खासगी वाहनांची वाढती संख्या यामुळे रस्त्याची वहन क्षमता संपुष्टात आली आहे. विशेषतः भिवंडी बायपास, कसारा घाट या भागांत तासन्तास वाहतूक ठप्प राहते. स्थानिक वाहनचालकांच्या मते 30 ते 35 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी अनेकदा दोन ते तीन तास लागतात.
परिणामी, इंजिन चालू ठेवावे लागल्याने डिझेल व पेट्रोलचा अपव्यय वाढतो. अभियांत्रिकी प्रशिक्षक राजेंद्र उत्तूरकर यांच्या अंदाजानुसार, दररोज या महामार्गावर सुमारे 30 ते 40 हजार लिटर इंधन वाया जाते, ज्याची वार्षिक किंमत अब्जावधी रुपयांत जाते. वाहतूक विभाग व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ विभागाकडून रस्त्याचे चौपदरीकरण व सुधारणा करण्याची आश्वासने गेल्या अनेक वर्षांपासून दिली जात आहेत. मात्र प्रत्यक्षात कामे कासवगतीने सुरू आहेत. काही ठिकाणी अर्धवट कामामुळे अपघातांचाही धोका वाढला आहे.
परिणामी, प्रदूषण, वेळेची नासाडी आणि आर्थिक तोटा या तिहेरी संकटाचा सामना प्रवासी व नागरिक करत आहेत. तज्ञ राजेंद्र उत्तूरकर यांचे असे मत आहे की, महामार्गाचा दर्जा सुधारला गेला नाही, तर पुढील काही वर्षांत हा तोटा आणखी दुप्पट होऊ शकतो. एका वर्षांत या महामार्गावरील कोंडीमुळे जवळपास 5 हजार 200 कोटींचे इंधन वाया गेले आहे.
तासन्तास थांबलेली वाहने
हा महामार्ग ठाणे, भिवंडी, शहापूर, कसारा मार्गे नाशिकला जोडणारा राज्यातील एक प्रमुख औद्योगिक मार्ग आहे. दिवसभरात हजारो मालवाहू ट्रक, कंटेनर आणि प्रवासी वाहने या मार्गावरून धावत असतात. परंतु, भिवंडी बायपास, वडपे, कसारा घाट या ठिकाणी मोठे बॉटलनेक निर्माण झाले आहेत. दहा किलोमीटरचा प्रवास करायला दोन तास लागतात. वाहतूक कोंडीत ट्रक थांबवून इंजिन बंद करण्याची सोय नसल्याने डिझेल जाळावेच लागते.
इंधनाचा कोट्यवधी रुपयांचा अपव्यय
वाहतूक तज्ज्ञांच्या मते, एका वाहनाने वाहतूक कोंडीत सरासरी 30 मिनिटे निष्क्रिय स्थितीत इंजिन चालवले, तर त्या दरम्यान 0.5 ते 1 लिटर इंधन जळते. महामार्गावर दररोज सुमारे सात ते आठ लाख वाहने धावत असतात. त्यातील अर्धी वाहने कोंडीत अडकतात. या गणनेनुसार, दररोज 30 ते 40 हजार लिटर इंधन जळते आणि वर्षभरात हा आकडा हजारो कोटी रुपयांपर्यंत पोहोचतो.
सकाळी खिडकी उघडली की डिझेलचा दर्प
कोंडीतून सतत निघणाऱ्या धुरामुळे परिसरातील हवा प्रदूषित झाली आहे.शहापूर व कसारा परिसरात पीएम 2.5 आणि पीएम 10 या प्रदूषणकणांचे प्रमाण मानक मर्यादेपेक्षा दुप्पट झाले आहे.असे पर्यावरण खात्याच्या आकडेवारीतून दिसते. स्थानिक रहिवासी सांगतात, “सकाळी खिडकी उघडली की डिझेलचा वास येतो. मुलांना श्वास घेताना त्रास होतो.”
नुकसानीचे प्रकार
गाडी बंद अवस्थेतील इंधन वाया जाणे खर्च : 2200 ते 2900 कोटी
वाहनांची जादा देखभाल खर्च ः 500 ते 800 कोटी
पुरवठा साखळी विस्कळीत होणे ः 1200 ते 1500 कोटी
उत्पादक वेळेचे नुकसान ः 1,095 कोटी
आरोग्य विषयक खर्च ः 200 ते 300 कोटी
दररोज सुमारे दोन अडीच तास आपण गाडीत बसून काही करत नाही.ना झोप, ना कुटुंबासोबत वेळ, ना काम.फक्त वाहतुकीच्या धुरात श्वास घेत गाडीत बसून इंधन जाळत राहतो. ठाणे, कळवा, कल्याण, भिवंडी व शहापूरदरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो लोकांसाठी ही कल्पना नाही. ही दैनंदिन वस्तुस्थिती आहे.30 मिनिटांचा प्रवास आता नियमितपणे 3 तास घेतो. पण ही केवळ गैरसोय नसून, या एका महामार्गावर दरवर्षी 5 हजार 200 ते 16 हजार 600 कोटी इतके नुकसान होते.
राजेंद्र उत्तूरकर, अभियांत्रिकी प्रशिक्षक.
दररोजच्या या वाहतूककोंडीच्या त्रासाने वाहन चालक व प्रवाशांच्या संयमाचा अंत झाला आहे. महामार्गावर कोंडी, खड्डे, आणि अपघात रोजचे झाले आहेत. घोषणांपेक्षा कृती कधी होणार, असा लोकांना संतप्त सवाल नागरिक विचारीत आहेत.
हेमंत वेखंडे, प्रवासी.