मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी मुलुंड पूर्व येथील जमास्प मिठागराची 42.51 एकर जमीन देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतला होता. मिठागराची ही जागा प्रकल्पाला देण्याबाबतची अधिसूचना नगरविकास विभागाकडून बुधवारी काढण्यात आली.
अदानी समूह धारावी झोपडपट्टीचा विकास करत असून धारावीतील काही झोपड्यांचे पुनर्वसन मुलुंड येथील या मिठागराच्या जमिनीवर केले जाणार आहे. पूर्वेस पूर्व द्रुतगती मार्ग, पश्चिमेस सीटीएस क्र. 1298 व 1314, दक्षिणेस खाडी व बट्टीवाला मिठागर, तर उत्तरेस मुंबई महानगरपालिकेचा स्मशानभूमी परिसर अशी या जमिनीची हद्द निश्चित करण्यात आली आहे.
नगर विकास विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, धारावी पुनर्विकास प्रकल्प आता या जमिनीच्या नियोजन व विकासासाठी जबाबदार राहील. या जमिनीचा विकास धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या चौकटीत केला जाईल, ज्यामुळे परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसन आणि समांतर शहरी विकासास चालना मिळेल, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.
धारावीतील अपात्र प्रकल्पग्रस्तांसाठी मुंबई महानगरातील सुमारे 255 एकर मिठागराची जमीन देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, या निर्णयला मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकेच्या माध्यमातून आव्हान देण्यात आले होते. मात्र, जुलै महिन्यात उच्च न्यायालयाने राज्य सरकारचा भूसंपादनाचा निर्णय योग्य ठरवत, ही जनहित याचिका फेटाळून लावली होती.