

राजू काळे
भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेच्या यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुलभ व जलदगतीने पूर्ण करण्यासाठी प्रथमच एकूण 24 प्रभागांसाठी 7 निवडणूक निर्णय अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या नियंत्रणाखाली मतमोजणी एका ठिकाणी नव्हे तर तब्बल 7 ठिकाणी करण्यात येणार असल्याचे समोर आले आहे.
यंदाची निवडणूक 2011 मधील जनगणनेतील लोकसंख्येच्या आधारे पार पाडण्यात येत आहे. यानुसार एकूण लोकसंख्या 8 लाख 9 हजार 378 इतकी असून गेल्या 14 वर्षांत या लोकसंख्येत सुमारे 6 लाखांची वाढ झाली आहे. 2011 मधील लोकसंख्येच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीतील मतदार याद्यांतील नोंदीनुसार एकूण मतदारांची संख्या 8 लाख 19 हजार 151 इतकी आहे. या मतदारांची संख्या 2011 मधील लोकसंख्येच्या तुलनेत जास्त असल्याचे दिसून आले आहे. यात महिला मतदारांची 3 लाख 86 हजार 78 व पुरुष मतदारांची संख्या 4 लाख 33 हजार 53 इतकी आहे. यंदाची निवडणूक मागीलप्रमाणेच 4 सदस्यीय पॅनलप्रमाणे होणार होणार असून एकूण सदस्य संख्या 95 इतकी आहे. ही सदस्य संख्या एकूण 24 प्रभागांमध्ये विभाजित करण्यात आली असली तरी प्रभाग क्रमांक 24 मध्ये 3 सदस्यांचे पॅनल निश्चित करण्यात आले आहे. एकूण 95 सदस्य संख्यांमध्ये 65 जागा सर्वसाधारण प्रवर्ग, 25 जागा इतर मागास प्रवर्ग, 4 जागा अनुसूचित जाती व 1 जागा अनुसूचित जमातीतील सदस्यांसाठी आरक्षित करण्यात आली आहे. 8 लाख 19 हजर 151 मतदारांना मतदान करण्यासाठी 198 ठिकाणे निश्चित करण्यात आली असून त्यात 976 मतदान केंद्रे निर्माण केली जाणार आहेत. या मतदान केंद्रांमध्ये निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा पालिकेकडून पुरविण्यात येणार आहेत. तर निवडणुकीत प्रथमच एकूण 7 निवडणूक निर्णय अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.