

भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने एकूण 95 जागांसाठी मंगळवारी आरक्षण सोडत पार पाडण्यात आली. त्यात विविध जातीनिहाय प्रवर्गानुसार एकूण 48 जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या. यानुसार एकूण 50 टक्के महिला आरक्षण सोडतीत काही प्रभागातील माजी नगरसेवकांचा हिरमोड झाल्याचे पाहायला मिळाल्याने एकंदरीत कही ख़ुशी कही गमचे चित्र दिसून आले.
आगामी पालिका निवडणुक 2011 मधील लोकसंख्येच्या आधारे पार पाडण्यात येणार असून गतवेळी लागू करण्यात आलेले 4 सदस्यीय पॅनल आगामी निवडणुकीतही कायम करण्यात आले आहे. यानुसार एकूण 24 प्रभागांमध्ये 95 सदस्य संख्या निश्चित करण्यात आली असून प्रभाग क्रमांक 24 मध्ये मात्र 3 सदस्यांचे पॅनल निश्चित करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक 24 मध्ये उत्तन परिसराचा समावेश होतो. एकूण 95 जागांसाठीची आरक्षण सोडत पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या उपस्थित मंगळवारी पार पाडण्यात आली.
या आरक्षण सोडतीत पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता सोडत काढण्यास सुरुवात करण्यात आली. त्यात प्रभाग क्रमांक 1, 3 ते 6 8, 11, 13, 14, 18, 20, 21 व 23 मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गांतर्गत महिलांसाठी एकूण 13 जागा आरक्षित करण्यात आल्या. यातील प्रभाग क्रमांक 4 मध्ये दोन जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गांतर्गत महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या.
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या एकूण 4 जागांपैकी प्रभाग क्रमांक 11 व 14 मधील प्रत्येकी एक जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या. सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी प्रभाग क्रमांक 1 ते 10, 12, 13, 15 ते 24 मधील एकूण 33 जागा आरक्षित करण्यात आल्या. यानुसार महिलांसाठी 50 टक्के आरक्षणानुसार एकूण 95 जागांपैकी 48 जागा आरक्षित करण्यात आल्याने त्याचा फटका काही माजी नगरसेवकांना बसल्याचे दिसून आले. त्यात प्रभाग क्रमांक 3 मधील भाजपचे गणेश शेट्टी यांच्या नागरीकांच्या मागासवर्ग प्रवर्गातील जागेवर महिलांचे आरक्षण जाहीर झाल्याने त्यांची तूर्तास पंचाईत झाली असली तरी या प्रभागातील दोन जागा खुल्या प्रवर्गासाठी असल्याने त्यांची त्या जागांवर वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
प्रभाग क्रमांक 11 मधील शिवसेनेचे अनंत शिर्के यांच्या अनुसूचित जागेवर महिलांचे आरक्षण जाहीर झाल्याने त्यांची अडचण निर्माण झाली आहे. तर प्रभाग क्रमांक 12 मध्ये एकच जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने त्यातील भाजपचे माजी नगरसेवक अरविंद शेट्टी व हसमुख गेहलोत यांची अडचण निर्माण झाली असली तरी येथील खुल्या प्रवर्गातील एका जागेवर शेट्टी यांना डावलण्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रभाग क्रमांक 13 व 14 मधील अनुक्रमे संजय थेराडे, सचिन म्हात्रे यांच्या नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग जागेवर महिलांचे आरक्षण जाहीर झाल्याने त्यांची पंचाईत झाली आहे.
हरकतींसाठी 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत
प्रभाग क्रमांक 19 मधील एक जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व 2 जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्याने उर्वरीत खुल्या प्रवर्गातील एका जागेवर येथील काँग्रेसचे माजी नगरसेवक अनिल सावंत व राजीव मेहरा यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार आहे. एकंदरीत कही ख़ुशी कही गमच्या वातावरणात आरक्षण सोडत जाहीर झाली असून त्यावर हरकती घेण्यासाठी 17 ते 24 नोव्हेंबर दरम्यान दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. नागरिकांना पालिका मुख्यालयातील तिसऱ्या मजल्यावरील निवडणूक विभागात लेखी स्वरूपातच हरकती दाखल करता येणार आहेत.