

नेवाळी : एमआयडीसीच्या डोंबिवली-अंबरनाथ महामार्गावर खोणी फाटा चौकात नवी मुंबई महापालिका परिवहन (एनएमएमटी) सेवेच्या बसचे ब्रेक फेल झाल्याने बुधवारी दुपारी भीषण अपघात झाला. डोंबिवली पाईपलाईन मार्गावरील खोणी फाटा चौकात भरधाव बस थेट समोर असलेल्या रिक्षावर आदळली. बसच्या या जोरदार धडकेमुळे रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला, तर नियंत्रण सुटलेल्या बसने पुढे जाऊन महावितरणच्या विजेच्या खांबालाही धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा पुढील भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.
एमआयडीसीच्या खोणी फाटा चौकात सकाळ सायंकाळ मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. मात्र बुधवारी दुपारच्या सुमारास अपघात झाल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.
बसचालक, वाहक पोलिसांच्या ताब्यात
अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प होती. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. अपघातग्रस्त बस चालक व वाहक यांना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून प्राथमिक चौकशी सुरू आहे. बसच्या देखभाल-दुरुस्तीतील निष्काळजीपणा, ब्रेक यंत्रणेची वेळेवर तपासणी न होणे आणि प्रवासी वाहतूक सेवांवरील दुर्लक्ष यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेतील बसची तांत्रिक स्थिती, नियमित फिटनेस प्रमाणपत्र, ब्रेक सिस्टिमची तपासणी आणि चालक प्रशिक्षण याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. वारंवार घडणार्या अशा घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला असून जबाबदार अधिकार्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मानपाडा पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण तपासाअंती स्पष्ट होणार आहे.