

ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीला मतदानाला 72 तास शिल्लक असल्याने आज सर्वपक्षीय उमेदवारांनी सुपर संडे म्हणून पायाला भिंगरी लावून जास्तीत जास्त मतदारांना गाठण्याचा प्रयत्न केला. सकाळी मॉर्निंग वॉकपासून योगा करण्यापर्यंत ते रात्री दहा वाजेपर्यंत सर्वच पक्षीय उमेदवारांनी झोपड्पट्टीपासून टोलेजंग संकुलात जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार नरेश म्हस्के यांनी मोटारसायकलवरून प्रचार करत मतदारांची मने जिंकली. तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिव्यात सभा घेवून दिवा ते सीएसएमटी स्वतंत्र लोकल सोडण्यात येण्याची महत्त्वाची घोषणा एका सभेत केली. आदित्य तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) खासदार खासदार सुरेश म्हात्रे, आमदार संजय केळकर, जितेंद्र आव्हाड, निरंजन डावखरे, राजन विचारे यांच्यासह नेत्यांनी ठाण्यातील मतदारांना आवाहन केले.
महायुती, महाविकास आघाडी, काँग्रेस आणि एनसीपी पक्षाच्या उमेदवारांनी पहाटे गार्डनमधील योगा तसेच व्यायाम करणाऱ्या मतदारांना गाठून प्रचार केला. सार्वजनिक ठिकाणी रॅली काढण्यात आल्या. गुप्त बैठकांसह कमिटीच्या बैठका घेण्यात आल्या. गृहसंकुलात जाऊन सर्व पक्षीय उमेदवारांनी सुपर संडेचा सदपयोग केला. उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी घरोघरी पत्रके वितरीत करण्यात आले. नोकरदारांमुळे रविवारी सुट्टीचा फायदा घेत उमेदवारांनी बाजी मारली.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मोठ्याप्रमाणावर रॅली काढण्यात आल्या. प्रचार सभा घेण्यात आल्या. या सभा आणि रॅलीसाठी मोठ्याप्रमाणावर गर्दी जमविण्याची कसरत उमेदवारांना करावी लागत आहे. त्यासाठी अनेक उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह आपापल्या परिसरातील महिला व पुरुषांना रॅलीत सहभागी करून घेण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येकाला 1600 रुपये मानधन तर काही भागात एक हजार रुपये मोजले जात असल्याची चर्चा रंगली आहे. सकाळी आणि सायंकाळी अशा दोन टप्प्यात प्रचारासाठी इच्छुक महिला, पुरुष आणि मुलांना आमंत्रित केले जाते. ते सर्व जण घोषणाबाजी करीत हातात झेंडा, बॅनर घेऊन प्रचार करताना दिसत आहेत.