

Crime Branch Raid Illegal Liquor
डोंबिवली : कल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि अपर पोलिस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले यांनी दिले आहेत. त्यानुसार क्राईम ब्रँच, कल्याण युनिटने मोठी कारवाई करत सरमाडी दारूच्या दोन हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या.
क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित शिंदे व त्यांच्या पथकाने वडवली–शिरढोण गावाच्या सीमेवरील नदीकाठावर तसेच घेसर गावाच्या शिवारात सुरू असलेल्या अवैध हातभट्ट्यांवर धाड टाकली. या कारवाईत हातभट्टी निर्मितीसाठी वापरण्यात येणारे सुमारे ७ लाख ५० हजार रुपये किमतीचे साहित्य व रासायनिक पदार्थ (वॉश) जागीच जाळून नष्ट करण्यात आले.
वरिष्ठांच्या सूचनेनुसार क्राईम ब्रँचचे कॉन्स्टेबल गोरक्ष शेकडे ग्रामीण भागात गस्त घालत असताना वडवली–शिरढोण आणि घेसर परिसरात काही जण चोरीछुप्या पद्धतीने हातभट्ट्या चालवून त्यातून तयार होणारी सरमाडी दारू कल्याण–डोंबिवली शहर व ग्रामीण भागात वितरित करत असल्याची माहिती मिळाली. ही माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित शिंदे यांना कळविण्यात आली.
त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील, पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, किरण भिसे, सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे यांच्यावर कारवाईची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली सपोउपनि अमोल बोरकर, गुरुनाथ जरग, प्रशांत वानखेडे, सुधीर कदम, विजय जिरे, आदिक जाधव, विलास कडू, गोरक्षनाथ पोटे, पांडुरंग भांगरे, उल्हास खंडारे, सचिन कदम, सचिन भालेराव, दीपक महाजन, प्रविण किनरे, विनोद चन्ने, सतीश सोनवणे, गणेश हरणे, जालिंदर साळुंखे, मंगल गावित आदींच्या पथकाने धाड टाकली.
वडवली–शिरढोण गावाच्या सीमेवरील नदीकाठावर सुरू असलेल्या हातभट्टीवर राजेशकुमार रामयशस्वी यादव (वय ३०, रा. किर्तीराज चाळ, घेसर) हा त्याच्या तीन साथीदारांसह सरमाडी दारू गाळताना आढळून आला. पथकाने दारू निर्मितीसाठी वापरलेले ५० प्लास्टिक ड्रम (प्रत्येकी २०० लिटर) असा एकूण १० हजार लिटर वॉश जप्त करून नष्ट केला. या मुद्देमालाची किंमत सुमारे ५ लाख रुपये आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (क), (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
दुसऱ्या कारवाईत घेसर गावाच्या शिवारात एका वडाच्या झाडाखाली सुरू असलेल्या हातभट्टीवर धाड टाकण्यात आली. येथे नंदजी बुद्ध यादव (वय ५५, रा. सुकऱ्या पाटील चाळ, घेसर) हा त्याच्या तीन साथीदारांसह सरमाडी दारू गाळताना आढळून आला. पथकाने २५ प्लास्टिक ड्रम (प्रत्येकी २०० लिटर) असा एकूण ५ हजार लिटर वॉश जप्त करून नष्ट केला. या मुद्देमालाची किंमत सुमारे २ लाख ५० हजार रुपये आहे. या प्रकरणीही मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जेसीबीच्या साहाय्याने अड्डे उद्ध्वस्त
दारूमाफियांनी पुन्हा अड्डे उभारू नयेत, यासाठी दोन्ही ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने हातभट्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आल्या. तसेच स्थानिक ग्रामस्थांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी दारू तयार करण्यासाठी लागणारी रसायने निर्मनुष्य ठिकाणी जाळून नष्ट करण्यात आली.