

ठाणे : यावर्षी दिवाळी सणानिमित्त ठाणे महानगर- पालिकेच्या कर्मचाऱ्यांना 24500 रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिले आहेत.
या निर्णयामुळे महापालिकेच्या 9,221 कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात जाणार असून सर्व कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. गेल्यावर्षी महापालिका कर्मचाऱ्यांनी दिवाळीनिमित्त 24,000 रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले होते. यावर्षी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार 2025 साठी पालिका कर्मचाऱ्यांना 24500 रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. हे सानुग्रह अनुदान कर्मचाऱ्यांच्या खात्यात तत्काळ जमा करण्यात येणार आहेत.
कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी होण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सानुग्रह अनुदानाचा निर्णय घेतला आहे. महापालिकेचे कर्मचारी वर्षभर सर्व यंत्रणा सुरळीत सुरू राहावी यासाठी कार्यरत असतात. त्यांच्या सणाच्या आनंदात भर म्हणून हा सानुग्रह अनुदानाचा निर्णय घेण्यात आला आहे. सानुग्रह अनुदान जाहीर झाल्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
ठाणे महापालिकेचे 6059 कर्मचारी, शिक्षण विभागाचे 774 कर्मचारी, परिवहन विभागाचे 1400 कायम कर्मचारी, महापालिकेचे थेट कंत्राटी कर्मचारी व इतर असे 988 कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे, ठाणे महापालिकेवर सानुग्रह अनुदानापोटी सुमारे 23 कोटी इतके अतिरिक्त दायित्व येणार आहे.